रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर मध्ये सापडले बिबट्याचे दुर्मिळ पांढरे पिल्लू….

Spread the love

रत्नागिरी : जिल्ह्यातील एका जंगलात बिबट्याचे पांढऱ्या रंगाचे दुर्मिळ पिल्लू सापडले आहे. काजूची बाग साफ करताना ते शेतकऱ्यांना दिसले. त्याची आई त्याला घेऊन गेली आहे. त्याच्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आता वनखात्याने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.
     

बिबट्याच्या पिल्लांचा रंग बिबट्यासारखाच असतो. मात्र एका जंगलात शेतकऱ्यांना बिबट्याची दोन पिल्ले दिसली, ज्यात एका पिल्लाचा रंग पांढरा होता. त्यांना पिल्ले दिसली, त्याचवेळी मादी बिबट्या तेथे आली आणि ती पिल्लांना घेऊन गेली.

संगमेश्वर तालुक्यातील एका गावात आढळले बिबट्याचे पांढरे पिल्लू

संगमेश्वर तालुक्यातील एका गावात एक अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. याठिकाणी चक्क बिबट्याचे एक पांढऱ्या रंगाचे पिल्लू आढळून आले आहे. वनविभागाच्या इतिहासात कदाचित प्रथमच अशा प्रकारचे पांढऱ्या रंगाचे बिबट्याचे पिल्लू सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या गावातील जंगल परिसरात असणारी काजूची बाग शेतकरी साफ करत असताना त्याला हे अनोखे पांढऱ्या रंगाचे बिबट्याचे पिल्लू दिसून आले. त्यानंतर तातडीने खबरदारी घेत त्याची आई आणि त्याच्यात पुनर्मिलन घडवून आणले. या प्रकारानंतर वनविभाग सतर्क झाला आहे. सध्या हे पिल्लू आपल्या आईसोबत असून वनविभाग त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. यासाठी परिसरात विशेष कॅमेरा ट्रॅप्स लावण्यात आले आहेत, जेणेकरून त्यांच्या प्रत्येक हालचालीची नोंद घेतली जाईल.

दरम्यान, हे पांढरे पिल्लू ‘ल्युकिस्टिक’ (Leucistic) आहे की ‘अल्बिनो’ (Albino) याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे या पिल्लाचे डोळे अद्याप पूर्णपणे उघडलेले नाहीत, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

डोळे उघडल्यानंतर आणि पुढील वैद्यकीय तपासणीनंतरच त्याच्या रंगाचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल. ‘ल्युसिझम’ ही एक जनुकीय स्थिती आहे, ज्यामुळे प्राण्यांच्या त्वचेतील रंगद्रव्य कमी होते आणि ते फिकट किंवा पांढरे दिसतात, पण त्यांचे डोळ्यांचा रंग सामान्य असतो. तर ‘अल्बिनिझम’मध्ये रंगद्रव्य पूर्णपणे नसते, ज्यामुळे त्वचा आणि डोळे दोन्ही पांढरे किंवा गुलाबी दिसू शकतात. पहिल्यांदाच पांढऱ्या रंगाचे बिबट्याचे पिल्लू आढळल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. वनविभाग या पिल्लाच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत असून त्याच्या वाढीवर सतत लक्ष ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या दुर्मिळ पिल्लाच्या अधिक माहितीसाठी वनविभाग प्रयत्नशील आहे. वनविभागाने गावाचे नाव गोपनीय ठेवले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page