रत्नागिरी : आजचे हे पाप आहे ते २०१४ मीच तुमच्या माथी मारले आहे. हा उमेदवार तुम्हाला मी दिला होता आणि केवळ माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही त्याला निवडून दिला होता. २०१९ मध्ये ही दिलदारपणा दाखवला. मात्र बाळ माने तुम्ही युती झाल्यानंतर तुम्ही खळखळ नाही, केली बंडखोरी वगैरे केली नाही. पण आता मानेवरती घेतलेले हे भूत मानेवरून उतरवायला पाहिजे, असे टीकास्त्र उदय सामंत यांच्यावर साधतानाच आपले सरकार आल्यानंतर डाळ, तांदूळ, गहू, साखर, तेल या पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षासाठी आम्ही स्थिर ठेवून दाखवल्याशिवाय राहणार नाही. तसेच बारसू रिफायनरी प्रकल्पही हद्दपार करू, असे आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील सभेत दिले.
रत्नागिरी शहरातील जलतरण तलाव येथे महाविकास आघाडीचे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार बाळ माने यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांच्या भव्य दिव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राजन साळवी, गुहागर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार भास्कर जाधव, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत यादव, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, माजी खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बशीर मूर्तुजा, काँग्रेसच्या सरचिटणीस हुस्न बानू खलिफे, शिवसेनेचे युवा नेते अजित यशवंतराव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, सौ. नेहा माने, उल्का विश्वासराव, सौ माधवी माने, माजी आमदार रमेश कदम, माजी खासदार रवींद्र माने, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, माजी शहर प्रमुख प्रमोद शेरे, शहर संघटक, युवा सेना तालुकाप्रमुख आणि शहर संघटक प्रसाद सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. सभेला शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
शिवसैनिकांना संबोधित करताना ठाकरे म्हणाले, आपल्याला कोणीही पैसे फेकून विकत घेऊ शकत नाही. कितीही पैसे वाला असू दे, पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो स्वाभिमान, जिद्द आहे तो कोणी कितीही पैसेवाला उतरला तरी विकला जाऊ शकत नाही. मी आलो तेव्हा भास्करराव रंगात आले होते. अनेक मुद्दे त्यांनी मांडले. तुम्ही जे बोलले आहात ,तसे सभा घ्या आणि एकदा काय त्यांचा सुपडा साफ करून टाका. लोकसभेच्या वेळेला मी तुम्हाला भेटायला याच मैदानात आलो होतो. एका गोष्टीचे मला समाधान आहे आणि अर्ध थोडंसं वाईट पण वाटते आहे. या भागाने आपल्याला चांगले म्हणजे तुम्ही सगळ्यांनी चांगले आशीर्वाद दिले. मात्र सिंधुदुर्गात आपण कमी पडलो. आता असं होता कामा नये तिकडे सुद्धा मी जाणारच आहे. विशेष म्हणजे आपल्या वरती जे आरोप करतात घराणेशाहीचे त्यांना मला आता विचारायचे की इकडे दोन भाऊ खात आहेत, तिकडे दोन भाऊ आणि एक वडील बसलेत खायला. कोकणामध्ये दुसरे कोणी जगायचे नाही. इकडे वरच्या बाजूला आले तर हे बसलेत आणि खाली गेलेत का ते बसलेत. सर्वसामान्य कोकणी बांधवांनी आणि माता भगिनींनी जायचं कुठे करायचं काय, असा निशाणा ठाकरे यांनी सामंत बंधू आणि राणे कुटुंबीयांवर साधला.
ते पुढे म्हणाले, आमच्यावरती ठाकरे म्हणून घराणेशाहीचे आरोप केलात ते मला मान्य आहेच, कारण मी ती परंपरा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि ती परंपराने घेऊन पुढे चालले म्हणून आज माझ्याकडे काही नसतानाही हे सगळे आशीर्वाद देणारी माझी स्वतःची हक्काची माणसे माझ्यासोबत आहे. दुपारी मी कोल्हापूरला गेलो होतो. प्रचंड गर्दी होती. इतकी शेवटी म्हटलं येऊ दे त्यांना इकडे डी मध्ये येऊ द्या अगदी स्टेजच्या खेटून लोक बसलेले. त्यांच्यात प्रचंड उत्साह होता. सगळीकडे मशाल पेटलेली आहे. धगधगायला लागलेली आहे. ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो की कधी एकदा निवडणूक येते तो क्षण आता आहे. येत्या २० तारखेला कोकणात अगदी मुंबईपासून संपूर्ण किनारपट्टी मला मशाल पेटलेली बघायची आहे आणि यात खोकेबाजीचे राजकारण आपल्याला आत्ताच जाळून भस्म करावे लागेल. ही एका गुर्मीत चालणारी लोक आहेत, त्यांच्या हातामध्ये तुम्ही तुमची मुलं-बाळ आणि तुमचा आयुष्य देणार आहात का? देणार असाल तर तुमचा प्रश्न आहे. पण त्यांना त्याला कळले पाहिजे की तुमच्या आणि त्यांच्यात मी उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा आहे. माने तुम्ही ज्या सोनेरी क्षणांच्या आठवणी सांगितल्या मी सुद्धा त्याला साक्षी आहेत. पण एक प्रश्न मला पडतो की ते क्षण जे होते सुवर्ण अक्षरात लिहावे असेच क्षण होते, काही नव्हते आपल्याकडे म्हणजे नगरसेवक निवडून आला, केवढे मोठे होते. आमदार, खासदार तर खूप लांबची गोष्ट होती. आपले पहिले आमदार निवडून आले ते वामनराव महाडिक, त्यावेळी मी लहान होतो पण एवढे अप्रुप होते की वामनराव आमदार झाले. त्याच्यानंतर वामनराव महाडिकच पहिले खासदार झाले. काय होते आपल्याकडे. पण आज मुंबईचा महापौर म्हणजे मोठे पद आहे ते पण आपल्याकडेच आहे. काहीही नव्हते तेव्हा आपण एकत्र होतो. कारण एक वेड होते आपल्यामध्ये की नाही आपल्या देशासाठी आपण एकत्र आले पाहिजे. हिंदुत्वासाठी एकत्र आले पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र राहिली होती. मग अशी परिस्थिती ओढवली भाजपला वेगळी चूल मांडावी लागली. आपले उद्दिष्ट गाठल्यानंतर तुम्ही संकट काळात तुमच्यासोबत राहिलेल्या शिवसेनेला बाजूला काढून टाकले, अशी खदखद ठाकरे यांनी व्यक्त केली.
उदय सामंत यांच्यावर टीकास्त्र सोडताना ते पुढे म्हणाले, उदय सामंत त्यावेळी माझ्याकडे आले आणि म्हणाले, उद्धवजी मी निवडून येतो पण मला मंत्री बनवा. तेव्हा सत्ता आणायची होती. त्या मंत्रिमंडळाच्या कालखंडामध्ये आणि आता गेल्या अडीच वर्ष उद्योग मंत्री म्हणून तुम्ही जे काही काम केले असेल, घरचे उद्योग आणि बाहेरचे उद्योग किती केले ते सांगा. उद्योग मंत्री म्हणून
महाराष्ट्रात, रत्नागिरीत एकही उद्योग आणता आला नाही. जो मंत्री स्वतःच्या मतदारसंघात एक उद्योग आणू शकत नाही, असे निरोपयोगी मंत्री परत बेशरमपणाने मत मागायला येतात आणि आपण मत देणार का, असे ठाकरे म्हणाले.
राजन साळवींच्या जो महाराजांचा पुतळा आहे त्याची किंमत लावायला निघाले. महाराज फक्त पुतळ्यामध्ये नाही महाराज आमच्या हृदयामध्ये आहेत. महाराजांच्या पुतळ्याची किंमत केली, पण तिकडे सिंधुदुर्गात मोदींच्या अशुभ हाताने जो पुतळा उभा केला होता, जो कोसळला त्याची किंमत केली तर तुमची लायकी कळेल. त्यात किती पैसे खाल्ले. केवळ आठ महिन्यांमध्ये पुतळा पडतो. महाराजांचा पुतळा पडू शकतो आणि महाराष्ट्र सहन करू शकतो असे तुम्हाला वाटलेच कसे. त्याच्यानंतर मोदी माफी मागितली पण महाराष्ट्र तुम्हाला पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही .आपले सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. मी घरी बसून सगळ्यांची घरे सांभाळली आणि म्हणून महाराष्ट्राची जनता मला कुटुंबप्रमुख मानते. पण घर फोडणारी अवलाद तुमची. माझी, आपली शिवसेना फोडली, शरद पवारांचे घर फोडले आणि राज्य करताय आणि आम्हाला तुम्ही सांगताय आणि काय केले नाही, असे विचारताय. मी जर काही केले नसते, तर ही जनता आजपर्यंत माझ्यावरती प्रेम करत आहे तिचे प्रेम कधीच आटले नाही आणि म्हणून मी तुम्हाला विचारतोय की मी असा काय कोणता गुन्हा केला होता, अडीच वर्षांमध्ये मी मुख्यमंत्री असताना एक जागतिक महामारी आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या साथीने आणि सोबतीने संपूर्ण महाराष्ट्रात खबरदारी घेतली. संपूर्ण देशामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा पडून दिला नाही. कारण तुम्ही सोबत होतात. यांनी काय केले, कुठे होते कुठे सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, कुठे गंगेमध्ये प्रेत वाहत होत, पण अशी एकही मृतदेहाची विटंबना आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली नाही. कमीत कमी मृत्यू कसे होतील याची पूर्ण खबरदारी आपल्या सरकारने त्यावेळी घेतली. फक्त दहा रुपयांमध्ये गरिबांना शिवभोजन थाळी मिळत होती. आता ही योजना सुरू आहे की नाही माहिती नाही पण आपले सरकार आले तर ही योजना पुन्हा वाढवणार आहे. माझ्या गोरगरिब जनतेला पोटभर अन्न मिळालेच पाहिजे. आपले सरकार आल्यानंतर हे आपण केल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी आज तुम्हाला देतोय, असे ठाकरे यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेचा समाचार घेताना ते म्हणाले, महिलांना ते फसवत आहेत. महिलांसाठी योजना देत आहेत, महिलांना जे पंधराशे रुपये मिळत आहेत त्यातून तुमचे घर चालते, तर अनेकींनी सांगितले की पैसे मिळतात पण महागाई एवढी प्रचंड वाढली आहे की पंधराशे रुपये आमच्याकडे येईपर्यंत ते संपून जात आहे आणि तिकडे शेतीच्या बांधावरती उतरल्यानंतर ज्या काम करणारे शेतमजूर महिला आहेत त्यांना मी विचारले काय पंधराशे रुपये मिळाले, तर व्हय मिळाले म्हणे, पंधराशे रुपये ठीक आहेत पण मी मुलाला मी शिकवू शकत नाही. आई-वडिल कष्ट करतात ते मुलं मोठी होण्यासाठी करतात. मुलगा शिकला पाहिजे, ते गोष्ट ठीक आहे पण मुलगी शिकली, प्रगती झाली आणि पंधराशे देऊन घरी बसवली. स्वतःच्या पायावर उभे कधी राहणार, कोण करणार आणि म्हणून मी ठरवले आहे आपले सरकार आल्यानंतर उच्च तंत्रज्ञानापर्यंत शिक्षण हे मोफत दिले जाते तसे महाराष्ट्रमध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलाला सुद्धा आपले सरकार मोफत शिक्षण दिले जाणार. स्वतःची मुले कष्टाने कमवून जो खास तो एक रुपया तरी असला ना तर त्याची किंमत तुमच्या पंधराशेला नाही, पंधरा हजार कोटींनाही नाही, हे तुम्हाला कळणार नाही. कारण तुम्ही सगळे खाऊ व्यापारी आहात. बदलापूरमध्ये जी दुर्घटना घडली, त्या माऊलीला राज्यातील तीन भाऊ आहेत ना एक देवा भाऊ, दुसऱ्या दाढी भाऊ आणि तिसरा कोटवाल भाऊ या तिघांही भावाना मी सांगतोय तिघांना एकत्र मिळून जोडे खायचे असतील तर जा तिकडे त्या माऊलीकडे आणि त्यांना द्या पैसे. मग बघा कसे जोडे मिळतील. महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे, म्हणून आम्ही ठरवले आहे की महिलांसाठी पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस शिपाई असलेली स्वतंत्र पोलीस ठाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करू. महिला तिकडे तक्रार घेऊन गेल्यानंतर त्यांची दखल त्वरित घेतली जाईल आणि ताबडतोब कारवाई होईल.
महाराष्ट्रातले अनेक रोजगार गुजरातला पळवून नेले आणि महाराष्ट्राच्या माथी मारले ते बारसूसारखे रिफायनरीवाले उद्योग. मात्र आपले सरकार आले तर हे प्रदूषणकारी प्रकल्प तिथून हद्दपार करण्याची जबाबदारी आमची. इथे भाजपचे जुने कार्यकर्ते किंवा संघाचे सदस्य असतील तर त्यांना मी नम्रतेने विचारू इच्छितो की त्यांच्या मनाच्या वेदना काय आहेत. भाजपचे अध्यक्ष नड्डा सांगत आहेत आता आम्हाला संघाची गरज नाहीये, मग कोणासाठी काम करताय, १०० वर्ष तुम्ही, तुमच्या पिढ्यानपिढ्या संपूर्णपणे वाया घालवल्यात कोणाला डोक्यावरती घेऊन बसला तुम्ही. हा भाजप संघवाल्यांना तरी मान्य आहे का? आणि भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना तरी हा भाजप आणि भाजपचे नेतृत्व मान्य आहे? कापसावरती एक रोग येतो तो खोडाला लागतो आणि खोड पोखराला लागतो, तसा हा दाढीवाला खोडकिडा भाजपला लागलेला आहे. भाजपा पोखराला लागला आहे. गेला कुठे तो आडवाणींचा भाजप, अगदी जुनी लोक होती त्यांनी खस्ता खाऊन वेळप्रसंगी रक्त सांडून मेहनत करून जे एक स्वप्न जोपासले होते, त्या स्वप्नाला आता खोडकिडा लागलेला आहे. आताचा मुख्यमंत्री ओरिजिनल कोणत्या पक्षाचा आहे, तर शिवसेना. दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष कोणत्या पक्षाचे आहेत, दोन्ही पक्षाचे दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते कोणत्या पक्षाचे आहेत तर शिवसेनेचे, मग हा करंटेपणा करायचे का सुचले? आता महाराष्ट्राला दिशा देण्याची वेळ आलेली आहे आणि महाराष्ट्राला दिशा देण्याची देण्याचा जो अधिकार आहे हा तुमच्या हातामध्ये आहे. मी आता येता येता कोणीतरी मला सांगितले की येत्या ८ तारखेला शिवसेनेच्या नावामध्ये, चिन्हामध्ये बदल करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा फैसला होणार आहे. मधल्या काळात आपण बातमी वाचली की न्यायदेवतेच्या डोळ्याची पट्टी काढले आता तरी मला अपेक्षा न्यायदेवतेला दिसते की नाही.. का तुला आवडी नुसती सुनावली आहे आणि मी सर्वोच्च न्यायालयाच्या त्या न्यायमूर्तींना सुद्धा हात जोडून विनंती करतो, न्याय केवळ उद्धव ठाकरेसाठी नाही तर देशातल्या लोकशाहीसाठी मागतो आहोत. अशा पद्धतीने जर का कोणी कोणाला फोडून सत्ता काबीज करायला लागले तर लोकांचा जनतेचा लोकशाही वरचा आणि न्यायालयाच्या सुद्धा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही. ही पद्धत आपल्या देशात चालणार नाही, ही चालू शकत नाही. आमची शिवसेना व माझं नाव तुम्ही दुसऱ्याला नाही देऊ शकत, जे नाव माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबांनी दिले ते दुसऱ्याला नाही देऊ शकत तुम्ही, असे ठाकरे म्हणाले.