
रत्नागिरी: भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत राबवण्यात येत असलेल्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेत रत्नागिरी जिल्ह्याने देशात अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदकाचा मान मिळवला आहे. नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्याला हा प्रतिष्ठेचा ‘एक जिल्हा एक उत्पादन’ राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला. या यशामुळे रत्नागिरीने केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागामार्फत एक जिल्हा एक उत्पादन’ योजना देशातील प्रत्येक जिल्ह्यातून निवडलेल्या उत्पादनाच्या ब्रँडिंग आणि प्रोत्साहनासाठी राबवली जाते. या राष्ट्रीय पुरस्कारासाठी देशभरातील सर्व जिल्ह्यांनी नामांकन केले होते.
राष्ट्रीय स्तरावरील भौतिक पडताळणीमध्ये महाराष्ट्रातून नाशिक, अमरावती, नागपूर, अकोला, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, अहमदनगर, बीड, बुलढाणा, धुळे आणि गोंदिया या १४ जिल्ह्यांची निवड झाली होती. या संदर्भात, २६ डिसेंबर २०२४ रोजी भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे सह व्यवस्थापक ताशी डोर्जे शेर्पा यांनी रत्नागिरी जिल्ह्याला विशेष भेट दिली होती. या भेटीदरम्यान, त्यांनी जिल्ह्याच्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ असलेल्या हापूस आंब्याशी निगडीत उद्योगांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी सादरीकरण केले होते, ज्याची दखल केंद्र सरकारने घेतली.
सोमवारी भारत मंडपम, नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या ‘राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार २०२४’ कार्यक्रमात महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांना ‘राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ भारत सरकारकडून जाहीर झाले. यामध्ये महाराष्ट्र राज्याची सुवर्णगटामध्ये निवड झाली आहे. या ५ जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला असून, देशांमध्ये रत्नागिरी जिल्हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे.

पुरस्कार प्राप्त झालेले महाराष्ट्रातील ५ जिल्हे:
रत्नागिरी (देशात प्रथम क्रमांक पटकावला)
नाशिक
अमरावती
नागपूर
अकोला
हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. या पुरस्कारामुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला आणि हापूस आंबा उत्पादकांना निश्चितच मोठा बूस्टर मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे!
केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये त्यांच्या भाषणात रत्नागिरीच्या हापूस आंब्याचा विशेष उल्लेख केला. या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी श्री. सिंह आणि जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आसगेकर हे उपस्थित होते. कोकण विभागातून ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचा निवड जोडलेल्या १४ जिल्ह्यांमध्ये समावेश होता. त्यामधून रत्नागिरी जिल्ह्याला प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार” प्राप्त झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रोत्साहनातून आणि उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डाॕ उदय सामंत आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा या पुरस्कारासाठी पात्र ठरला आहे. तसेच त्यांच्याच प्रेरणेतून रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या दोन्ही योजनांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याने सन २०२३-२४ व २०२४-२५ या संलग्न दोन वर्षांमध्ये उत्कृष्ट कार्य केल्यामुळे रत्नागिरी जिल्हा राज्यामध्ये अग्रेसर राहिला आहे.
पुरस्कार म्हणजे जिल्ह्यातून निवडलेल्या उत्पादनाचा विकास, मूल्यवर्धन, रोजगार निर्मिती व बाजारातील यशस्वी सादरीकरण करणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार भारत सरकारकडून दिला जातो. या पुरस्कारामुळे जिल्ह्याची राष्ट्रीय स्तरावर ओळख, उत्पादनासाठी नवीन बाजारपेठांची उपलब्धता, उद्योग व कारागिरांना रोजगार व प्रशिक्षण, पर्यटन व आर्थिक विकासाला चालना इत्यादी फायदे रत्नागिरी जिल्ह्याला होणार आहेत.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी पुरस्काराबद्दल पालकमंत्री महोदय, महसूल राज्यमंत्री महोदय, लोकप्रतिनिधी, शेतकरी, जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि रत्नागिरीवासियांचे अभिनंदन केले आहे.
🎤जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर