26 तोळे सोने व रोख रक्कम केली हस्तगत तसेच आरोपींना केले गजाआड…
दिनांक 27/01/2023 रोजी मांडवी रोड येथील “घरकुल अपार्टमेंट” मधील एका घराच्या दरवाजाचा, एका अज्ञात इसमाद्वारे कडी व कोयंडा तोडून, एकूण 26 तोळे सोने व ₹30,000/- रोख रक्कम चोरण्यात आली होती.
या घरफोडी च्या अनुषंगाने रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं. 22/2023 भा.द.वि.स.क. 454 व 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकामार्फत निरंतर तपास चालू असताना गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करण्यात आला.
या गुन्ह्यामध्ये एका संशयित महिलेसह एका इसमास फिर्यादी यांचे राहते घराच्या दरवाजाची कडी व कोयंडा तोडून घरात प्रवेश करून बेड-रुम मधील कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करून नेल्याचे पोलीस तपासात सांगितल्याने त्यांना दिनांक 25/03/2023 रोजी अटक करण्यात आली आहे.
दोन्ही आरोपीत यांचेकडे गुन्हयातील चोरी केलेले दागिन्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीत यांनी गुन्हयातील चोरी केलेले दागिने शेजारील जिल्ह्यातील साथीदाराच्या मदतीने एका सोनाराकडे विक्री केल्याचे सांगितले वरुन दिनांक 27/03/2023 रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकातील तपास पथकाने शेजारील जिल्ह्यात जाऊन गुन्हयातील आरोपीत क्रमांक 3 याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही परंतु आरोपीतांनी गुन्हयातील चोरीस गेलेले दागिने विक्री केलेल्या सोनाराचे दुकान दाखविले असता या सोनाराचे दुकानातून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले.
या गुन्ह्यातील एकूण चोरीस गेलेले विविध सोन्याचे दागिने व ₹30,000/- रोख असे एकूण ₹8,30,000/- (आठ लाख तीस हजार) किंमतीचा 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
दोन्ही आरोपीत यांना मा. न्यायालयाने दि. 26/03/2023 रोजी पासून पुढे 07 दिवस पोलीस कोठडी मंजुर केली आहे. तसेच या महिलेच्या, (शेजारील जिल्ह्यामधील) अन्य एका साथीदाराचा शोध सुरू आहे तसेच गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.
ही कारवाई रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील खालील नमूद पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी केलेली आहे.. पोउनि/आकाश साळुंखे, पोहेकाँ/615 प्रसाद घोसाळे, पोहेकाँ/1239 प्रविण बर्गे, पोहेकाँ/1399 अमोल भोसले, पोना/124 संकेत महाडीक, पोना/483 मनोज लिंगायत, पोना/1112 आशिष भालेकर, पोना/1447 पंकज पडेलकर व पोना/1273 विनय मनवल
या गुन्ह्याचा तपास करण्याकरिता व अज्ञात चोरटयाचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री. विनित चौधरी यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक श्री. आकाश साळुंखे व पोलीस अंमलदार यांना मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्फत प्राप्त सूचनांच्या आधारे अधिक मार्गदर्शन केले..