चिपळूण :- माजी उपनगराध्यक्ष तसेच नुकतेच उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती झालेले निशिकांत भोजने यांनी जिल्हा उपाध्यक्ष पदासह भाजप सदस्य पदाचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकला आहे. वैयक्तिक कारणामुळे मी पदाला आणि पक्षाला वेळ देऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट करत थेट जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे.
माजी आमदार बाळ माने भाजप जिल्हाध्यक्ष असताना निशिकांत भोजने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपसाठी त्यांनी त्यावेळी अहोरात्र काम केले.
चिपळूण शहरात भाजपला उभारी देण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांचे काम आणि नगर परिषदेसंदर्भात त्यांचा अभ्यास पाहता भाजपकडून त्यांना नगरसेवक पदाची उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या प्रभागात त्यांनी निवडणूक लढवून स्वतःसह अन्य एक महिला नगरसेवक देखील निवडून आणले. पुढे त्यांना उपनगराध्यक्ष पदावर संधी देण्यात आली होती. या पदावर त्यांनी अडीच वर्षे उत्तम काम केले होते.
दरम्यानच्या काळात त्यांचे पक्षातील काही लोकांशी बिनसले. विशेष करून तत्कालीन स्वीकृत नगरसेवक विजय चितळे व निशिकांत भोजने यांच्यामध्ये सतत खटके उडत राहिले. त्यातून वरिष्ठ नेत्यांपर्यंत तक्रारी देखील झाल्या होते. त्यामुळे भोजने पक्षात नाराज होते. गेले काही महिने ते राजकारणापासूनच अलिप्त राहिले होते.
मात्र भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी नुकतीच उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर केली. त्यामध्ये निशिकांत भोजने यांना जिल्हा उपाध्यक्ष पदावर संधी देण्यात आली. त्यामुळे भोजने पुन्हा सक्रिय झाल्याचे बोलले जात होते. परंतु भोजने यांनी आता पद आणि पक्षाला देखील थेट रामराम ठोकण्याचा निर्णय घेऊन चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्षांना त्यांनी लेखी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
याविषयी भोजने यांनी पत्रात म्हटले आहे की, मी कोणत्याही पदावर काम करण्यास इच्छुक नसताना मला उपाध्यक्ष पद देऊन आपले प्रेम व्यक्त केलेत, पण मला या पदावर काम करता येणार नाही. माझे कार्यकर्ते तसेच माझ्या प्रभागातील नागरिकांचे विकासात्मक तसेच वैयक्तिक कामे होत नाहीत. तशी राजकीय परिस्थिती देखील आता नाही.
मी उपाध्यक्ष सारख्या जबाबदार पदाला व पक्षाला देखील वेळ देऊ शकत नाही. मी माझ्या व्यवसायात मग्न असून माझी आर्थिक परिस्थिती देखील चांगली नाही. आशा परिस्थितीत पद घेऊन खुर्ची अडवून ठेवणे मला अजिबात पसंत नाही. माझा कोणावर राग नाही, की मी नाराज देखील नाही. परंतु मी पक्षाला वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे मी जिल्हा उपाध्यक्ष पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.