
चिपळूण : गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव आणि चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम १८ वर्षांनंतर प्रथमच एका राजकीय व्यासपीठावर एकत्र आले. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी दोघांनी देवरूख, संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात एकत्र सभा घेतल्या. त्यामुळे या दोघांमधील ४० वर्षांपासून असलेले राजकीय वैर आणि १८ वर्षांपासूनचे राजकीय अंतर संपल्याचे पाहायला मिळाले.
भास्कर जाधव आणि रमेश कदम यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत होतं. पूर्वीच्या काळी भास्कर जाधव शिवसेनेत असताना रमेश कदम काँग्रेसनंतर राष्ट्रवादीत होते. त्या वेळी दोघांमधील टोकाचे राजकीय वैर होते. दोघांनी एकमेकांवर हल्लेही केले होते. विधानसभा, लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या वादाचे पडसाद उमटत होते. २००४ मध्ये भास्कर जाधव यांनी अपक्ष निवडणूक लढवली तेव्हा त्यांचा पराभव झाला.
२००६ मध्ये ते राष्ट्रवादीत आले. त्यानंतर दोघांमधील राजकीय वैर थांबेल, असे सर्वांना वाटले होते; परंतु ते चालू राहिले. २००९ च्या निवडणुकीत भास्कर जाधव आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री झाले. चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत त्यांनी रमेश कदमांच्या पॅनेलविरोधात शहर विकास आघाडीचे पॅनेल दिले होते. २०१९ मध्ये भास्कर जाधव राष्ट्रवादीतून पुन्हा शिवसेनेत गेले; मात्र राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हे दोघे पुन्हा एकत्र आले. दोघांच्या भेटीगाठी होत होत्या. मात्र हे दोघे राजकीय व्यासपिठावर फारसे एकत्र आले नाहीत.
मागील लोकसभा निवडणुकीतही जाधव रत्नागिरी जिल्ह्यापासून अलिप्त होते. कदम मात्र शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्याबरोबर सातत्याने होते. या वेळी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी जाधव जिल्ह्यात फिरतील की, नाही याबाबत अनेकांमध्ये शंका होती. मंगळवारी जाधव महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारात उतरले. देवरूख येथे झालेल्या सभेत सर्वाधिक चर्चा होती ती भास्कर जाधव आणि रमेश कदम एकत्र आल्याची.