
चिपळूण :- मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्याला आपला पाठिंबाच आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. जालना येथे झालेला लाठीहल्ला अयोग्य असून, पोलिसांच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे. त्याचा निषेध करायला हरकत नाही, असे ते म्हणाले.
आरपीआयच्या कोकण विभागीय मेळाव्याच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री रामदास आठवले चिपळूणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, हिंदू-मुस्लिमांमध्ये ऐक्य व्हावे, त्यांच्यामध्ये दुही निर्माण होऊ नये, यासाठी समान नागरी कायदा महत्त्वाचा आहे. या कायद्याच्या माध्यमातून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण बसेल.
राज्यघटनेत बदल करण्याची आवश्यकता नसून, नवीन कायदे करण्याचा अधिकार लोकसभेला आहे. त्यामुळे कुणी त्यावर भाष्य केले असेल, तर आमच्या सरकारमध्ये घटना बदलण्याबाबत कोणताच विषय नाही, असेही त्यांनी सांगितले.
आपण ज्या पक्षात जातो त्यांना सत्ता मिळते. याआधी शरद पवारांबरोबर आपण होतो. त्यावेळीही आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली. मंत्रिपदासाठी आपण कुठल्याही पक्षात जात नाही. सत्तेसाठी आमचे राजकारण नाही, तर मी सत्तेच्या बाजूने जातो आणि तेथे पद मिळते, असेही ते म्हणाले.
अजित पवार यांना महायुतीत आम्ही आणले नाही. ते स्वत:हूनच आले आणि ताकदीनिशी आले आहेत. इंडियाचा एनडीएवर काही परिणाम होणार नाही आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार, असेही आठवले म्हणाले.
आरपीआय केंद्रात व राज्यात सत्तेत आहे. राज्यात आम्हाला एक मंत्रिपद देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. आम्ही अजूनही त्याची प्रतीक्षा करतोय. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आरपीआयला राज्यात लोकसभेसाठी दोन आणि विधानसभेसाठी आठ ते दहा जागा मिळतील, असा विश्वास मंत्री आठवले यांनी व्यक्त केला.