खेड :- नारायण राणे पक्ष सोडून गेले तेव्हा जे मला गाडीच्या पुढच्या सिटवर घेतल्याशिवाय मातोश्री बाहेर पडण्याचे धाडस करू शकत नव्हते. ते जीभ हसडायची भाषा करत आहेत. जीभ हसडायला मनगटात बळ आहे का, असा सवाल करत नाव आणि चिन्ह चोरी होताना तुम्ही कुठे होतात असा पलटवार, शिवसेना नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रविवारी खेड येथे शिवगर्जना सभा पार पडली. त्यानंतर रामदास कदम यांनी सोमवारी खेड येथील जामगे येथे त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांच्या सभेचा समाचार घेतला. यावेळी कदम म्हणाले, माझ्या बालेकिल्लात उद्धवजींची सभा झाली, हे बरोबरच आहे. कारण खेड तालुका शिवसेना भगवामय रामदास कदम यांनीच केला. त्याही पलीकडे जाऊन प्रत्येक गावात वीज, रस्ता, पाणी असे सर्व प्रकारची विकास कामे मीच केली आहेत म्हणुनच खेड तालुका हा माझा बालेकिल्ला आहे. हे कदाचित उद्धव ठाकरे यांना माहीत नसेल मात्र बाळासाहेबांना माहीत होते. माझ्या प्रत्येक निवडणुकीत विजयानंतर मातोश्रीवर औक्षण होत होते. भरणे येथील उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, मातोश्री वृद्धाश्रम याचे उद्घाटन स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले आहे. त्यामुळे मातोश्री माझ्यासाठी नवीन नाही मात्र काल येथे जो राजकीय शिमगा उद्धव ठाकरे आणि काही व्यक्तींनी केला त्यात खेड तालुक्यातील किती लोक उपस्थित होते ? सर्व मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , सातारा, कराड येथील भाड्याची माणसे आणून आम्ही किती मोठी विराट सभा घेतली असा देखावा उभा केला, असा आरोप कदम यांनी केला.
ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी एकदा नाही शंभरवेळा अशा सभा घेतल्या तरी योगेश कदम यांना ते पराभूत करू शकत नाही. मला राजकारणातून संपवण्याचे काम केले जात होते. उद्धवजी तुमचा चेहरा अत्यंत भोळा दिसतो मात्र त्या चेहर्याच्या मागे अनेक चेहरे लपले आहेत त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे. तुम्ही असे म्हणालात ज्याच्या हाती धनुष्यबाण तो चोर पण ज्याच्या हाती धनुष्यबाण तो खरा रामभक्त. रामाचे पवित्र धनुष्य सगळ्यांच्याच हातामध्ये मिळत नाही. हे धनुष्यबाण तुम्हाला मिळू शकले नाही कारण तुमचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. भांडुपचे आमदार अशोक पाटील यांनी दापोलीच्या जाहीर सभेत त्यांच्या आमदारकीचा सौदा कसा झाला हे सांगितले आहे, त्यामुळे तिकीट देण्यासाठी किंवा कापण्यासाठी तुम्ही जर पैसे घेत असाल तर आशा हातात प्रभू रामचंद्र तरी धनुष्य देतील का असा सवाल त्यांनी केला.