
जनशक्तीचा दबाव न्यूज | भांबेड | मार्च ३१, २०२३
लांजा तालुक्यात अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आपण पहात आहोत. यामुळे तालुक्यातील विकासकामे प्रभावित होऊन एकंदर रहाणीमान आणि गावरहाटी विस्कळीत झाली आहे. स्थानिक आमदार, खासदार आपल्याच धुंदीत सर्व काही आलबेल असल्याचा आव आणत आहेत. मात्र गावातील हलाखीची परिस्थिती पाहून त्यांच्या मनात कणव निर्माण होत नाही.
कोलेवाडी भांबेड येथे आज भाजपा उद्योग आघाडी महिला समिती कोकण विभाग सहप्रमुख सौ. राजश्री ऊर्फ उल्का विश्वासराव यांनी जागेची पहाणी करून त्या ठिकाणी लवकरच भव्य धरण बांधण्याचा संकल्प उद्धृत केला. यावेळी भाजपा लांजा तालुका उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर, श्री. श्रीकांत ठाकूरदेसाई, शक्तीकेंद्र प्रमुख श्री. प्रमोद गुरव, भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. “या धरणाचा लाभ कोलेवाडी भागातील साधारण ९ वाड्या, तेथील साडेपाचशे लोकवस्ती, शेती व पशुपालनासाठी होणार आहे. अनेक लोक विविध व्यवसायांची निर्मिती करून पुन्हा एकदा गावात स्थायिक होऊ शकतात. त्यादिशेने आपण सर्वांनी प्रयत्न करूया.” असे आवाहनही सौ. विश्वासराव यांनी यावेळी केले.
याचवेळी केंद्र सरकारच्या माध्यमातून कोलेवाडी भागासाठी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विहिरीच्या कामाची पहाणी केली. आवश्यक माहिती घेतली काही सूचना दिल्या. त्यामुळे या भागातील पाणी प्रश्न लवकरच निकाली निघणार याची खात्री ग्रामस्थांना झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही.