
*रत्नागिरी:* भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी राजेश सावंत यांची फेरनिवड तर उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सतिश मोरे यांची निवड करण्यात आली. भाजपकडून नूतन जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा मंगळवारी करण्यात आली.
उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदावर नवीन चेहर्याला संधी देण्यात आली आहे. या ठिकाणी सतीश मोरे यांची निवड करण्यात आली. मात्र दक्षिण जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. दक्षिण जिल्हाध्यक्ष पदावर नव्या चेहऱ्याला संधी दिली जाईल अशी शक्यता होती. मात्र, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगर परिषदांची निवडणूक लक्षात घेऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनुभवी आणि दांडगा राजकीय अनुभव असलेल्या राजेश सावंत यांच्याच खांद्यावर पुन्हा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. यापूर्वी दक्षिण रत्नागिरीत तालुकाध्यक्षांची नियुक्ती करताना बहुतांश ठिकाणी जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली होती.
रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत तर रायगड उत्तर जिल्हाध्यक्षपदी अविनाश कोळी व रायगड दक्षिण धैर्यशील पाटील यांना संधी देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीने ५८ जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष निवडले आहेत. उत्तर मुंबई जिल्हाध्यक्षपदी दिपक बाळा तावडे, उत्तर पूर्व मुंबई दिपक दळवी, उत्तर मध्य मुंबई विरेंद्र म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.