
शरद पवार यांनी आजवरच्या एकही भाषणात कधीच शिव छत्रपतींचा नाव घेतले नाही
रत्नागिरीत मनसेच्या सभेला मोठी गर्दी…
रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्प बारसुला होणार की अन्यत्र यातच सर्व मश्गूल आहेत. मात्र प्रकल्प जाहीर होण्याआधीच कवडीमोल भावाने आपल्या जमिनी विकत घेतल्या जातात. त्यानंतर प्रकल्प जाहीर होतो. राजकीय नेत्यांचे दलाल या तुमच्या जमिनी विकतात हे तुम्हाला काळात नाही का? आपल्या कोकणात जे आहे तेच गोवा, केरळ मध्ये आहे. तेथे हे प्रकल्प कधी जात नाहीत. आम्ही मात्र दलालांना जमिनी विकून आपल्या भागात असे प्रकल्प लादून घेतो. आपण कोकण कडे, कोकणातील क्षमतांकडे कधी लक्ष देणार, असा सवाल राज ठाकरे यांनी रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल मैदानावरील मनसेच्या सभेत केला.
राज ठाकरे म्हणाले, मी शिव स्मारकाला विरोध करतो आहे असा आरोप करणाऱ्या शरद पवार यांनी आजवरच्या एकही भाषणात कधीच शिव छत्रपतींचा नाव घेतले नाही. आजवरची सर्व भाषणे कडून बघा. शाहू फुले आंबेडकर यांचे नाव ते घेतात. ही नावे घेतलीच पाहिजेत. पण शिवछत्रपतींचे नाव ते का घेत नाहीत, याचे उत्तर ते महाराष्ट्राला देणार की नाही, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. रत्नागिरी येथील मनसे च्या जाहीर सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले , मला आत्ताच घडलेल्या राजकीय घटनेवरून असे वाटते की शरद पवार यांना खरोखरच राजीनामा द्यायचा होता. परंतु पक्षात नेता म्हणून राहून अजित पवारांकडून ए तू गप्प बस…शांत रहा…असे ऐकून घ्यावे लागेल. हे सर्व ओळखूनच पवार यांनी राजीनामा मागे घेतला असावा, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. शरद पवार यांच्यावर आणि विरोधकांवर त्यांनी टीका केली.
बारसूमध्ये रिफायनरी होऊ शकत नाही
बारसूमध्ये कातळशिल्प सापडली आहेत. युनेस्को नावाची एक मोठी संस्था आहे, या संस्थेचे जगभरातल्या १९२ देशांबरोबर करार आहेत. यात भारताचा देखील समावेश आहे. युनेस्को अंतर्गत येणाऱ्या अंजिठा, वेरुळची लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स अशा अनेक वास्तू आहेत, या वास्तू युनेस्कोच्या अखत्यारित येतात. ही संस्था ठरवते की, या वास्तूंच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची विकासकामं होणार की नाही. जिथे या प्रकारच्या हजारो वर्ष जुन्या वास्तू असतात, त्याच्या आजू-बाजूला तुम्हाला विकासकामं करता येत नाहीत. त्यामुळे बारसू मध्ये रिफायनरी कशी होईल?
मुंबई गोवा महामार्गाच्या कोकणातील २००७ पासून रखडलेल्या कामावरही राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. मी गेल्या वेळी कोकणात आलो तेव्हा मी रस्त्याची स्थिती पाहून देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. तेव्हा ते म्हणाले नितीनजींना फोन लावला तर बरं होईल, तेव्हा मला गडकरींनी सांगितले की ठेकेदार पळून गेले. कोकणातल्या माणसाला गृहीत धरले जाते, फक्त मतांसाठी वापर केला जातो, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. ही स्थिती बदलण्यासाठी सर्वांनी कणखर बनायला हवे.
या सभेला मनसेचे मुंबईतील नेते तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि अन्य जिल्ह्यातील नेते उपस्थित होते.