मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात येताच मराठा समाजाने ‘एक मराठा, एक लाख मराठा’चा घोषणा दिल्या. तसेच राज ठाकरेंचा ताफा देखील आडविण्याच प्रयत्न केला.
*🔹️महत्त्वाच्या अपडेट-*
*▪️मराठा आंदोलकांच्या निशाण्यावर राज ठाकरे*
*▪️नांदेडमध्ये राज ठाकरेंविरोधात घोषणाबाजी*
*▪️राज ठाकरेंना मराठा समाजाची नाराजी भोवणार?*
*नांदेड :* मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसीय नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा हा दौरा 7 आणि 8 ऑगस्टपर्यंत असून आज राज ठाकरे यांचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले. राज ठाकरेंच्या या दौऱ्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. राज ठाकरे हे लातूरहून नांदेड शहरात आले. पण इथे देखील राज ठाकरेंना मराठा समाजाच्या आक्रोशाला सामोरं जावं लागलं. दरम्यान, या सगळ्या घडामोडीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेला याचा फटका बसणार का? याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
*नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?..*
राज ठाकरे हे लातूरहून नांदेडला आल्यानंतर ते सर्वात आधी शासकीय विश्रामगृहात गेले. त्यानंतर काही वेळाने ते नांदेडमधील एका खासगी हॉटेलमध्ये जाण्यास निघाले जिथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पण याचवेळी त्यांना मराठा आंदोलकांचा सामना करावा लागला.
जेव्हा राज ठाकरेंचा ताफा निघाला तेव्हा अचानक ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत काही आंदोलकांनी त्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यामुळे राज ठाकरेंच्या ताफ्याला कोणताही अडथळा आला नाही.दरम्यान, आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दुसरीकडे राज ठाकरेंचा ताफा शहरातील सुरक्षित परिसरात थांबला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांची बैठक बोलावली असून यामध्ये ते महत्त्वाची बैठक घेणार आहेत.
*धाराशिवमध्येही मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंना घेरलेलं …*
दरम्यान, 5 ऑगस्टला राज ठाकरे यांना धाराशिव येथे देखील संतप्त मराठा आंदोलकांसमोर जावं लागलं होतं.राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. यावेळी धाराशीवमध्ये एका हॉटेलमध्ये राज ठाकरे विश्रांतीसाठी थांबलेले असताना चार ते पाच मराठा आंदोलक हॉटेलमध्ये शिरले होते. या आंदोलकांनी राज ठाकरे यांच्या बॉडीगार्डजवळ भेटीची मागणी केली होती. मात्र राज ठाकरेंकडून भेट नाकारली होती. राज ठाकरे यांनी आम्हाला भेटीची वेळ द्यावी आणि मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा आदोलकांनी केली होती.
हा संपूर्ण प्रकार हॉटेलमध्ये घडत असताना राज ठाकरे हॉटेलमधून खाली आले आणि त्यांनी सर्वप्रथम आंदोलकांना घोषणा थांबण्यास सांगितले. त्यानंतर राज ठाकरे यांनी ‘तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे ना, मग वरती या”,असे म्हटले. पण चर्चा ही सर्वांसमोर व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केली. ज्यासाठी राज ठाकरे हे तयार झाले नाही. यामुळे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी थेट राज ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा दिल्या होत्या.