मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांच्या मागे कुणीतरी असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मनोज जरांगे यांच्या मागून कोण बोलतंय हे लवकरच स्पष्ट होईल. मी त्यांची भेट घेतली तेव्हाच त्यांना अशाने आरक्षण मिळणार नाही असे सांगितले होते, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी अनेक विषयावर आपली मते मांडली. सरकार अन् शरद पवार यांच्यावर त्यांनी टीकेची तोफ डागली. त्याशिवाय अजित पवार यांच्यावरही हल्लाबोल करत मराठा आरक्षणाच्या मुद्यालाही हात घातला. मी मनोज जरांगे यांना भेटून सांगितले होते अशाने आरक्षण मिळणार नाही. मुळात त्यांच्या मागे कोण आहे, त्यांना बोलायला कोण सांगत आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव होत आहेत, हे लवकरच समोर येईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका का होतात? हे मला आज पर्यंत कळले नाही, तिथे उमेदवार नावाखाली सही किंवा अंगठा असे लिहिले असते, मग या निवडणुका का घेतातच कशाला? पण त्याची सुरुवात झाली आहे, आम्ही तयारी करतो आहे, सिनेटसाठी देखील तयारी करतो आहे.
राज ठाकरे म्हणाले की, अमित शहा यांनी अयोध्या मंदिराच्या नावावर पुन्हा एकदा लोकांना भाजपला मतदान करण्यास सांगितले. भाजपचे सरकार आले कर सर्वांना अयोध्येतील राम मंदिराचे एक एक करून दर्शन घ्यायला नेऊ, असे अमित शहा म्हणाले होते. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.
राज ठाकरे म्हणाले की, अमित शहांनी आता टूर अँड ट्रॅव्हल्स अस नवीन खातं उघडलं असेल. कुणी काय काम केली यावर निवडणूक लढवा. राम मंदिरांचं आमिष कशाला दाखवता, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकीय परीस्थितीवर देखील भाष्य केले आहे. राज्यात घाणेरडी परिस्थिती आहे. मतदार येणाऱ्या निवडणुकीत काय करणार आहेत हे पाहावे लागेल. उमेदवारांना मतदारांची भीती वाटली पाहीजे. राज्याची स्थिती संभ्रमावस्थेत टाकणारी आहे. सध्याच चित्र सरळ दिसत नाही.