रेल्वेतून लघुशंकेसाठी उतरला अन् दुसऱ्या रेल्वेच्या धडकेने जीव गेला..

Spread the love

संगमेश्वर  :-  बांधकाम मजुरीचे काम करणारा माणूस मूळचा उत्तर प्रेदशातील. त्याला काम मिळाले केरळला. तिकडे जाण्यासाठी आधी तो मुंबईत आला आणि कोकण रेल्वेने केरळकडे निघाला. संगमेश्वर स्थानकात रेल्वे क्रॉसिंगसाठी थांबली असताना तो लघुशंकेसाठी खाली उतरला आणि थोड्याचवेळात बाजूने जाणाऱ्या रेल्वेच्या धडकेने जखमी झाला. तब्बल २२ दिवस रत्नागिरीत त्याने मृत्यूशी झुंज दिली. पण तो अयशस्वी ठरला.


      

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ,राजू रामविलास यादव (३९, रा. हातिमपूर, जिल्हा देवरिया, उत्तर प्रदेश) असे या प्रौढाचे नाव आहे. राजू यादव आणि खबर देणारा इंदलकुमार श्रीप्रसाद (रा. हाटा, जि. कुशीनगर, उत्तर प्रदेश) रस्त्याच्या बांधकामासाठी कामगार म्हणून काम करतात. केरळ येथे रस्त्याच्या गटाराचे काँक्रीटचे काम करण्यासाठी दि. १६ जून २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या दरम्यान गोरखपूर लोकमान्य टिळक एक्स्प्रेसने हे दोघेजण निघाले. दि. १८ जून २०२५ रोजी ते मुंबई येथे उतरले. त्यानंतर केरळ येथे जाण्याकरिता नेत्रावती एक्स्प्रेस गाडीमधील जनरल डब्याने निघाले.
       

ही गाडी सायंकाळी सहा ते सव्वासहाच्या दरम्यान संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात क्रॉसिंगसाठी थांबली. राजू यादव लघुशंकेसाठी खाली उतरला. रेल्वे रुळाच्या बाजूला उभा राहून तो लघुशंका करत असतानाच बाजूने जनशताब्दी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने जात होती. या गाडीची धडक राजू यादव याला लागली. त्यात राजूच्या हाताला व कंबरेला गंभीर दुखापत झाली होती. त्याला प्रथम खासगी रुग्णवाहिकेने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी औषधोपचार करून त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र, उपचार सुरू असतानाच राजू यादव याचा मृत्यू झाला आहे. याची नोंद गुरुवारी १० जुलै रोजी दुपारी २ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालय पोलिस चौकीत दाखल करण्यात आली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page