
देवरूख- देवरूख शहरातील यशस्वी उद्योजक व यश काँप्यूटरचे मालक राहुल विनायक फाटक (वय-४२) यांचे आज मंगळवारी सकाळी १० वाजता पुणे येथे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले आहे.
राहूल फाटक यांनी आपले इंजिनियरचे शिक्षण पूर्ण करुन मोठ्या पगाराच्या नोकरीची अपेक्षा न बाळगता आपल्या गावी जावून तेथील लोकांची कामे करायची हे ध्येय बाळगून देवरुख येथे त्यांनी यश काँप्यूटरची शाखा सुरु केली. अल्पावधीतच राहुल यांनी आपल्या विनम्र स्वभावाने सर्वांची मने जिंकुन व्यवसायात जम बसवला. उद्योगधंदा सांभाळतच राहुल व त्यांची पत्नी स्नेहा यांनी भारतीय जनता पार्टीसाठी तन, मन, धन अर्पून सेवा दिली. तालुक्यात दोघांनी आपल्या पदाला न्याय मिळवून दिला. राहुल यांनी सरचिटणिसपदाची व सौ. स्नेहा फाटक यांनी महिला आघाडीची बाजू नेटाने सांभाळली.
राहुल फाटक यांनी आपण अजातशत्रु आहोत हे दाखवून दिले. सतत हसरा चेहरा व सगळ्यांच्या संकटात धावुन जाणे हे व्रत राहुल यांनी शेवटपर्यंत जपले. राहुलने शैक्षणिक क्षेत्रातही भरीव योगदान दिले. आपलं देवरुख-सुंदर देवरुखचाही ते एक भाग बनले होते. गेले सहा महिने राहुलने आजाराशी मुकाबला केला पण नियतीला हे मान्य नव्हते. शेवटी नियती जिंकली व राहुल यांना यातून सुटका मिळाली नाही. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, विवाहीत बहिण असा परिवार आहे. राहुल यांच्या अकाली जाण्याने देवरुख शहरातून हळहळ व्यक्त होत आहे.