
फाल्गुन महिन्यातील अमावास्येला सोमवार, ८ एप्रिल रोजी सूर्यग्रहण होत आहे. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार ८ ते ९ एप्रिल दरम्यान रात्री होईल. भारतामध्ये सूर्यग्रहण दिसणार नाही, यामुळे येथे ग्रहणाचे कोणतेही सुतक पाळले जाणार नाही. उज्जैनचे ज्योतिषी पं. मनीष शर्मा यांच्या मते, ८ एप्रिलचे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री ९.१२ वाजता सुरू होईल आणि पहाटे २.२२ वाजता संपेल. हे ग्रहण अमेरिका, ग्रीन लँड, मेक्सिको, कॅनडा आदी देशांमध्ये दिसणार आहे. संपूर्ण सूर्यग्रहण अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये दिसणार आहे. जाणून घ्या ग्रहणाशी संबंधित पौराणिक कथा…
समुद्रमंथनाची कथा राहु-केतूशी संबंधित…
सूर्यग्रहणाची कथा ही समुद्रमंथनाशी संबंधित आहे. प्राचीन काळी देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले. या मंथनात 14 रत्ने सापडली. समुद्रमंथनाच्या वेळी अमृत बाहेर पडल्यावर त्यासाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध सुरू झाले. त्यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला आणि देवांना अमृत पाजण्यास सुरुवात केली. त्यावेळी राहू नावाच्या राक्षसानेही देवाचे रूप धारण करून अमृत प्यायले. चंद्र आणि सूर्याने राहूला ओळखले आणि भगवान विष्णूंना याची माहिती दिली. विष्णुजींनी संतापून राहुचे डोके शरीरापासून वेगळे केले. मात्र राहूनेही अमृत प्यायले होते, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला नाही. तेव्हापासून राहू चंद्र आणि सूर्याला आपला शत्रू मानतो. हे ग्रह वेळोवेळी पीडित असतात. शास्त्रात या घटनेला सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण म्हणतात.
सुतक काळात पूजा करू नये, मंत्रांचा जप करावा. ग्रहण संपल्यानंतर पैसे आणि धान्य गरजू लोकांना दान करावे. 8 एप्रिलचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे येथे ग्रहणाचे सुतक होणार नाही. अमावस्येशी संबंधित दानधर्म आणि इतर धार्मिक कार्ये तुम्ही दिवसभर करू शकता.
विज्ञानानुसार सूर्यग्रहण कसे होते?…
ग्रहण ही खगोलीय घटना आहे. जेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा सूर्यग्रहण होते. या काळात सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात. पृथ्वीच्या ज्या भागात चंद्राची सावली पडते, तिथे सूर्य दिसत नाही, याला सूर्यग्रहण म्हणतात.