
खेड : खेड तालुका आणि सातारा जिल्ह्याला जोडणार्या रघुवीर घाटात यंदाच्या पावसाळ्यातील पहिली मोठी दरड कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखवलेल्या कमालीच्या तत्परतेमुळे बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही दरड हटवून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.या जलद कार्यवाहीमुळे कांदाटी खोर्यातील आकल्पे गावातून खेड व खोपी येथील शाळा-महाविद्यालयांत जाणार्या शेकडो विद्यार्थ्यांची आणि नोकरदार वर्गाची मोठी गैरसोय टळली. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्रवास विनाअडथळा पार पडला, ज्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
वास्तविक, दरवर्षी पावसाळ्यात रघुवीर घाटात दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात आणि त्यामुळे कांदाटी खोर्यातील जवळपास 21 गावांचा संपर्क तुटतो. हा पूर्वानुभव लक्षात घेऊन यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने घाटातील संभाव्य दरडग्रस्त भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच परिणाम म्हणून दरड कोसळताच यंत्रणा तातडीने कामाला लागली. दरम्यान, सोमवारी रात्रीही याच घाटात दरड कोसळली होती, ती देखील विभागाने तातडीने हटवली होती. विभागाच्या या सतर्कतेमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत न होता वेळेवर पूर्ववत करण्यात यश येत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. यामुळे कांदाटी खोर्यातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे