रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळली… दरड हटवून वाहतूक सुरळीत..

Spread the love

खेड :- रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात बुधवारी मध्यरात्री पुन्हा एकदा दरड कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. चार दिवसांत हा दुसरा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी अकल्पे येथून खेडकडे येणारी एसटी बस घाटातच अडकून पडली. या बसमध्ये खेड तालुक्यातील खोपी येथील शाळेत जाणारे विद्यार्थीही होते. या विद्यार्थ्यांना तब्बल तीन तास बसमध्ये अडकून राहावे लागले.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून दरड हटवण्याचे काम सुरू केले. अकराच्या सुमारास दरड हटवण्यात आल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
दरड हटविल्यानंतर सकाळी ८.३० वाजता खेडमध्ये पोहोचण्याची अपेक्षा असलेली बस तब्बल तीन तास उशिराने, म्हणजे ११.३० वाजता खेड बसस्थानकात पोहोचली, अशी माहिती खेड आगाराचे व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांनी दिली.
रघुवीर घाटात वारंवार दरड कोसळण्याच्या घटनांमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. प्रशासनाने या भागातील सुरक्षेची अधिक प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page