पंढरपूर – आषाढी एकादशीच्या दिवशी व्हीआयपी दर्शन बंद असणार आहे. याबाबत राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकत्याच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीत भाविकांना सहज आणि सुलभ दर्शनाचा लाभ होणार आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात मोठ्या संख्येने आमदार, खासदार, अधिकारी, ठेकेदार हे व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली मंदिरात गर्दी करत असतात. अशा सर्वांनाच यंदा महसूल मंत्री विखे पाटील यांच्या निर्णयामुळे चाप बसणार आहे. परिणामी भाविकांना थेट दर्शनाचा लाभ होईल. त्यामुळे व्हीआयपी दर्शन बंद करण्याच्या निर्णयाचे सध्या सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक विभागीय आयुक्त सौरभ यांच्यासह पंढरपूर मधील आषाढी वारीचा आढावा घेत विविध ठिकाणची पाहणी केली.
संजय राऊत म्हणतात मला अनेकदा धमक्या आल्या त्याबाबत मी सरकारकडे तक्रारी केल्या पण माझी दखल घेतली जात नाही. राऊत यांच्या या विधानाची विखे पाटील यांनी खिल्ली उडवत संजय राऊत हे स्वतःलाच धमकी देत असतात असे ते म्हणाले.
राज्यामध्ये महसूल विभागाने वाळूचे धोरण ठरवले त्याचप्रमाणे आता खडीसाठी सुद्धा लवकरच एक नवे धोरण ठरवले जाईल वाळूचा काळाबाजार थांबवण्यासाठी सॅंड क्रश वापरण्याची गरज असल्याचे मतही यावेळी महसूल मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केले.