पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी माझा मानसिक छळ केला:वादग्रस्त IAS पूजा खेडकरांचा आरोप; सामान्य प्रशासन विभागाकडे तक्रार…

Spread the love

*पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी माझा मानसिक छळ केला:वादग्रस्त IAS पूजा खेडकरांचा आरोप; सामान्य प्रशासन विभागाकडे तक्रार…*

*वाशिम-* वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपला मानसिक छळ केल्याची तक्रार पूजा खेडकरांनी केली आहे. पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी असताना हा छळ झाल्याची तक्रार पूजा खेडकरांनी केली.

सुहास दिवसे यांनी पूजा खेडकरांच्या विरोधात राज्य सरकारला अहवाल दिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली होती. त्यानंतर आता पूजा खेडकरांची कार्मिक मंत्रालयाच्या समितीकडून चौकशी केली जात आहे. पूजा खेडकरांचा प्रशिक्षणाचा कालावधी संपवण्यात आला असून त्यांना मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परत बोलवण्यात आलं आहे.

*पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर छळाचा आरोप*

पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य काही अधिकाऱ्यांच्या विरोधात छळवणूक केल्याची तक्रार केली आहे. खेडकरांची ही तक्रार सामान्य विभागाकडे वर्ग करण्यात आली असून वरिष्ठ अधिकारी त्यावर कारवाई करतील, असे सांगितले जात आहे. पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असून पुण्यामधील त्यांची काही काळाची कारकिर्द वादग्रस्त ठरली आहे. त्यांनी केलेल्या अवास्तव मागण्यांनंतर पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांची तक्रार राज्य शासनाकडे केली होती. त्यानंतर पूजा खेडकर यांची बदली वाशिममध्ये करण्यात आली.

पुण्यामध्ये असताना निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे चेंबर बळकावल्याचा आणि खासगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावून फिरल्याचा आरोप पूजा खेडकरांवर करण्यात आला. तसेच एक प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना पूजा खेडकरांनी कार्यालय, शिपाई अशा अवास्तव मागण्या केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

*पूजा यांना मसुरीला रुजू होण्याचे आदेश..*

पुण्यामध्ये कार्यरत असताना जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि इतर अधिकाऱ्यांनी आपली छळवणूक केल्याचा आरोप पूजा खेडकरांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. पूजा खेडकरांनी ही तक्रार सोमवारी केल्याची माहिती आहे. त्यानंतर केंद्र स्तरावरून वेगवान सूत्रे फिरली आणि पूजा खेडकरांचा प्रशिक्षण कालावधी संपवण्याचा आदेश देण्यात आला आहे. पूजा खेडकरांना आता 23 जुलैच्या आधी मसुरीतील प्रशिक्षण केंद्रात परत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page