संगमेश्वर : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद स्मारक स्थळी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना उपस्थितांनी अभिवादन करून आदरांजली अर्पण केली. १४ फेब्रुवारी, २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावर ७८ बस मधून सुमारे २,६०० केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सी. आर. पी. एफ.) जवान प्रवास करत होते. पुलवामा येथे जवानांच्या गाड्यांचा ताफा पोहोचला असता, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कारने सी. आर. पी. एफ. च्या ताफ्यातील वाहनांना धडक दिली. यावेळी स्फोट होऊन सी. आर. पी. एफ.चे ४० शूरवीर शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताच्या शूर जवानांनी बालाकोट सर्जिकल स्ट्राईकच्या रूपाने प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळ उदध्वस्त केले. या सर्व आठवणींना उजाळा मिळण्याचे निमित्त होते पुलवामा शहीद दिवसाचे. शहीद स्मारक स्थळावर माजी सैनिक अमर चाळके, संस्था उपाध्यक्ष कुमार भोसले, कार्यवाह शिरीष पाठक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी अभिवादन केले. आर्मी व नेव्हीचे छात्रसैनिक, सब लेफ्टनंट प्रा. उदय भाट्ये आणि सी. टी. ओ. प्रा. सानिका भालेकर यांनी मानवंदना दिली. याप्रसंगी आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय व अरुंधती पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह देशप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
फोटो- १.शहीद स्मारक स्थळावर अभिवादन करताना कार्यवाह श्री. फाटक, उपाध्यक्ष श्री. भोसले, ॲड. सौ.प्रभूदेसाई, प्राचार्य. डॉ. तेंडोलकर.
२. आर्मी व नेव्ही युनिटचे छात्रसैनिक व सब लेफ्टनंट प्रा. भाट्ये मानवंदना देताना.