जनशक्तीचा दबाव न्यूज | देवरुख | ऑक्टोबर ०३, २०२३.
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत आज मंगळवारी पार पडली. या बैठकीत दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’ राज्यातील नागरिकांना देण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाबद्दल मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच दुसरे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्र सरकारच्या सर्व मंत्र्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो.” असे भाजपा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे ४ जिन्नस होते. मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांची भर पडली आहे. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी अशा १ कोटी ६६ लाख ७१ हजार ४८० शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल. इतक्या व्यापक प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांचा विचार झाला आहे अशी महाराष्ट्रातील ही दुसरीच वेळ.”
“आनंदाचा शिधा किटमध्ये १ किलो साखर, १ लि. खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चणाडाळ, मैदा आणि पोहे असे साहित्य राहील. हा आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ५३० कोटी १९ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.” अशी विनंती अधटराव यांनी केली.