
रत्नागिरी दि २३ जुलै- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरी दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यामुळे जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. रत्नागिरी तालुक्यातील एमआयडीसी, चंपक मैदानाजवळ होणाऱ्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी त्यांचा हा संभाव्य दौरा असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
उद्योग क्षेत्रासाठी मोलाचा ठरणारा हा सेमी कंडक्टर प्रकल्प रत्नागिरीसारख्या कोकणातील भागात उभारला जात असल्यामुळे सुमारे ७ हजार युवकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे सामाजिक व आर्थिक चित्रच बदलण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमासाठी देशाच्या पंतप्रधानांचा उपस्थितीचा अंदाज निश्चित झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व तयारीला वेग देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या संभाव्य दौऱ्याची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून, त्यांच्या उपस्थितीमुळे या प्रकल्पास राष्ट्रस्तरीय महत्त्व प्राप्त होणार आहे.
कोकणातील औद्योगिक विकासाचे हे नवे पर्व ठरणार असून, या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याची ओळख एक औद्योगिक हब म्हणून निर्माण होण्याच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
पंतप्रधान मोदी हे या भूमिपूजनाच्या निमित्ताने रत्नागिरीत येत असतील तर ते रत्नागिरीसह संपूर्ण कोकणसाठी आशादायक पाऊल असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
