पॅरिस :- फ्रान्सच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी पॅरिसमध्ये जंगी स्वागत करण्यात आले.
दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी हे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा करणार असून फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.
या दौऱ्यामध्ये ते तेथील स्थानिक भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील. येथील विमानतळावर आगमन होताच फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली तसेच दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताचे गायनही करण्यात आले.फ्रान्स दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मोदी यांनी द्विपक्षीय रणनीतीक भागीदारी यामुळे अधिक भक्कम होईल असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी रात्री उशिरा फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांच्याशी चर्चा केली तसेच फ्रेंच सिनेटचे अध्यक्ष गेरार्ड लार्चर यांच्याशीही त्यांनी संवाद साधला.‘बॅस्टिल डे’ संचलनामध्ये मोदी सहभागी होणार असून येथे त्यांना मानवंदना देण्यात येईल. भारतीय हवाई दलाची तीन राफेल विमाने यावेळी चित्तथरारक प्रात्याक्षिके सादर करतील. तत्पूर्वी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन हे २०२२ मध्ये भारत दौऱ्यावर आले होते, त्यानंतरही अनेकदा त्यांची मोदींशी भेट झाली होती.हे दोन्ही नेते यंदा जपानमधील हिरोशिमा येथे ‘जी-७’ देशांच्या संमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले होते. या दौऱ्यामध्ये मोदी हे विविध कंपन्यांच्या ‘सीईओं’शी देखील संवाद साधतील. फ्रान्सचा दौरा संपल्यानंतर ते शनिवारी (ता.१५) संयुक्त अरब अमिरातीला रवाना होतील.