नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७१ हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्रे दिली आहेत. देशातील ४५ ठिकाणी आयोजित रोजगार मेळाव्याअंतर्गत हे पत्र देण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरुणांना संबोधित केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ७१ हजाराहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत, हे तरुणांच्या मेहनतीचं आणि यशाचं प्रतीक आहे. गेल्या नऊ वर्षांत केंद्र सरकारने सरकारी भरती प्रक्रिया सोपी करून नोकऱ्या देण्याबाबत कटिबद्धता दाखवली आहे. पूर्वी अर्ज करणे खूप अवघड होते, पण आता हे काम सोपे झाले आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागात ७१ हजार युवकांची भरती करण्यात आली आहे. त्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. ही भरती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधूनही करण्यात आली आहे. देशभरातील सरकारी विभागातील निवडलेले कर्मचारी भारतीय पोस्टल सेवा, पोस्टल इन्स्पेक्टर, कमर्शियल-कम-तिकीट लिपिक, कनिष्ठ लिपिक टंकलेखक, कनिष्ठ लेखा लिपिक, ट्रॅक मेंटेनर, सहाय्यक विभाग अधिकारी, निम्न विभाग लिपिक, उपविभाग अधिकारी, कर सहाय्य, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी सहाय्यक लेखाधिकारी, सहायक लेखापरीक्षा अधिकारी, विभागीय लेखापाल, लेखा परीक्षक, हवालदार, निरीक्षक, नर्सिंग अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, फायरमन, हेड कॉन्स्टेबल, असिस्टंट कमांडंट, प्राचार्य, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, सहाय्यक निबंधक, सहाय्यक प्राध्यापक अशा अनेक पदांसाठी भरती केली जात आहे.