पंतप्रधान मोदी आज शिर्डी दौऱ्यावर; सुमारे ७५०० कोटींच्या विविध विकासकामांच होणार लोकार्पण..

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगरमधील शिर्डीच्या दौऱ्यावर येणार आहेत. शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीनं भाविकांच्या सुविधेसाठी उभारलेल्या 110 कोटी रुपयांचे नवीन दर्शन क्यू कॉम्प्लेक्स आणि शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण आज (26 ऑक्टोबर) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

अहमदनगर (शिर्डी): पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (26 ऑक्टोबर) शिर्डी येथे येत आहेत. यावेळी एसी दर्शन रांग, शैक्षणिक संकुल, निळवंडे प्रकल्प आदी कामांच लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या सोबतच मोदींच्या उपस्थितीत येथे शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळं हा मेळावा ऐतिहासिक होणार असल्याचं या दौऱ्याच्या आयोजकांकडून सांगितलं जातंय.

दर्शनरांगेची वैशिष्ट्य काय :

शिर्डीत येणाऱ्या देश-विदेशातील भाविकांना सुकर आणि सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी साई संस्थाननं १०९ कोटी रुपये खर्चून वातानुकूलित तीन मजली दर्शनरांग प्रकल्प तयार केला आहे. या दर्शनरांगेच्या माध्यमातून दिवसभरात एक लाख भाविकांना दर्शन घेता येणार आहे. १९ ऑक्टोबर २०१८ रोजी या प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं. त्यानंतर चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला.ही आहेत दर्शनरांगेचे वैशिष्ट्ये-दर्शनरांग प्रकल्पाचं बांधकाम क्षेत्रफळ २ लाख ६१ हजार ९२० चौरस फूट आहे. घडीव दगडाची वातानुकुलीन दर्शन रांग, प्रवेशासाठी ३ भव्य प्रवेशद्वार, एकाचवेळी सुमारे ४५ हजार भाविकांना मौल्यवान वस्तू, मोबाईल ठेवण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था, ४८ बायोमेट्रिक पास काऊंटर, २० लाडू प्रसाद काउंटर, २ विभूती काऊंटर, २ साईंचे कापड कोठी काऊंटर, २ बुक स्टॉल्स, १० देणगी कांऊटर, ०६ चहा, कॉफी काउंटर व बँग स्कँनर, २५ सेक्युरिटी चेकअप सेंटर, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर भाविकांसाठी १० हजार क्षमतेचे १२ वातानुकूलीत हॉल, आरओ प्रक्रियेचे शुध्द पिण्याचे पाणी, प्रथमोपचार केंद्र अशी या दर्शनरांगेची वैशिष्ट्ये आहेत.

निळवंडे प्रकल्प :

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा आणि उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील १८२ गावांमधील ६८८७८ हेक्टर (१ लाख ७० हजार २०० एकर) शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. सिन्नर तालुक्यातील ६ गावांमधील २६१२ हेक्टर शेतजमीन वगळता अहमदनगर जिल्ह्यातील ६६२६६ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ची सुरूवात :

काकडी येथील शेतकरी मेळाव्यात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या योजनेत महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ८६ लाखाहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम देऊन त्यांना लाभ दिला जाणार आहे. यामुळं शेतकऱ्यांना आता वर्षाला १२ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. तसंच यावेळी महाराष्ट्रातील ८६ लाख शेतकऱ्यांना १७१२ कोटी रूपयांच्या पहिल्या हप्त्याचं पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन वितरण केलं जाईल.

या कामांचही होणार लोकार्पण :

अहमदनगर येथील आयुष हॉस्पिटलचं उद्घाटन, महिला व बाल रूग्णालयाचं भूमिपूजन, शिर्डी विमानतळाजवळ नवीन टर्मीनल बिल्डिंगचं भूमिपूजन देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. तसंच कुर्डुवाडी-लातूर रोड रेल्वे विभागाचं विद्युतीकरण (१८६ किमी), जळगाव ते भुसावळला जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग (२४.४६ किमी), एनएच-१६६ (पॅकेज-१) च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधा यांचं लोकार्प देखील मोदींच्या हस्ते होणार आहे.

‘हे’ राहतील उपस्थित :

कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य मंत्रीमंडळातील इतर मंत्री, राज्यमंत्री, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थितीत राहणार आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page