अमेरिका आणि पाकिस्तान संबंधात गेल्या काही वर्षापासून तणाव निर्माण झाल्याचा दावा माध्यमातून करण्यात येत होता. मात्र आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पत्र लिहिलं आहे.
अमेरिका- अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध जगजाहीर आहेत. अमेरिकेनं नेहमीच पाकिस्तानला मैत्रिचा हात पुढं केला. इमरान खान पंतप्रधान असताना जुलै 2019 मध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली होती. त्यानंतर मात्र अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये कोणताही व्यवहार झाला नव्हता. आता मात्र अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ पत्र लिहिलं आहे. “आमच्या काळात जागतिक पातळीवर सर्वाधिक राजकीय आणि धार्मिक दबाव असलेला देश,” असा उल्लेख राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी यावेळी पत्रात केला आहे.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचं केलं नाही अभिनंदन….
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांचा पराभव करत पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. मात्र असं असतानाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचं अभिनंदन केलं नाही. या पत्रात जो बायडन यांनी पाकिस्तानात होत असलेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत अवाक्षरही काढलं नाही. पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्याविषयी या पत्रात कोणताच उल्लेख नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. याउलट हवामान बदल, मानवाधिकार, शिक्षण आणि आरोग्याबाबत अमेरिका नेहमीच पाकिस्तानला सहकार्य करण्यास तयार असेल, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
आर्थिक वाटाघाटीासाठी पाकिस्तानला अमेरिकेची गरज….
सध्या पाकिस्तान मोठ्या आर्थिक अडचणींमधून जात आहे. त्यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधींकडून ( IMF ) मोठ्या मदतीची गरज आहे. ही मदत मिळवण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेचा पाठींबा गरजेचा आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पत्र पाठवल्यानं अमेरिकेचा पाकिस्तानला पाठींबा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांचा पाकच्या मंत्र्याशी संभाषण…
पाकिस्तानात इम्रान खान यांचं सरकार जाऊन शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. त्यानंतर अमेरिकेकडून शाहबाज शरीफ यांचं अभिनंदन करण्यात आलं नाही. मात्र अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी दुरध्वनीवरुन संवाद साधला. दोन्ही देशातील संबंध मजबूत करण्यासाठी समर्पण करण्याचा पुनरुच्चार मंत्री इशाक दार यांनी केला. यावेळी दोन्ही देशांनी परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य करण्याची दोन्ही देशानं स्पष्ट केलं. यासह गाझा, लाल समुद्र आणि अफगाणिस्तानातील घडामोडींवरही यावेळी चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पाकिस्तानबाबत अमेरिकेचं धोरण बदललं….
इम्रान खान यांची सत्ता खालसा करुन शाहबाज शरीफ हे पंतप्रधान पदावर विराजमान झाले. मात्र 8 फेब्रुवारीला पार पडलेल्या पाकिस्तानातील या निवडणुकीमध्ये हेराफेरी झाल्याचा दावा अमेरिकन राज्यकर्त्यांनी केला आहे. अमेरिकन काँग्रेसच्या 30 सदस्यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना पत्र लिहित नवीन सरकारबाबत सावधगिरी बाळगण्याचा इशारा जो बायडन यांना दिला. या सदस्यांनी पाकिस्तानच्या निवडणुकीत हेराफेरी केल्याचा दावा केल्यानं मोठी खळबळ उडाली. त्यामुळेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन केलं नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
चीन आणि अमेरिकेसोबत संबंध संतुलित ठेवण्याचा प्रयत्न…
अमेरिकन राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पत्र लिहिनं मदतीचं आश्वासन दिलं. दुसरीकडं पाकिस्तानलाही अमेरिकेसोबत मैत्रिपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. पाकिस्ताननं एकाच वेळी चीन आणि अमेरिका या दोन्ही महासत्ता असलेल्या देशांसोबत संबंध संतुलित ठेवण्याचं काम केलं. मात्र अफगाणिस्तानातून अमेरिकेनं माघार घेतल्यानं हे संबंध बिघडले होते. यावेळी अमेरिकेनं पाकिस्तानला दोष देत माघार केली. इम्रान खान युक्रेन युद्धाच्या वेळी मॉस्कोला गेल्यानंतर हे संबंध ताणले गेले. त्यानंतर आपल्या हकालपटीला अमेरिका जबाबदार असल्याचं इम्रान खाननं स्पष्ट केलं.