मुंबई : गेल्या काही वर्षापासून राजकारणापासून अलिप्त राहिलेले माजी खासदार अनंत गीते आता पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मदतीला धावले आहेत त्यामुळे त्यांच्या निष्ठेचे फळ लवकरच त्यांना मिळण्याची चिन्हे दिसत आहेत आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने आतापासूनच हालचालींना सुरुवात केली आहे. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना येत्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून मुंबईतून उमेदवारी दिली जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेसाठी ठाकरे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाल्यास गीते यांचे मुंबईतून पुनर्वसन करून त्यांना लोकसभेत पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे.
राज्यात राजकीय पक्षांकडून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. अनंत गीते हे ठाकरे गटासोबत आहेत. त्यांचे कोकणात दौरे वाढत आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार हे अद्यापही निश्चित व्हायचे आहे. त्यांना मुंबईतील एखाद्या मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते; कारण मुंबईतील शिवसेनेतून निवडून आलेले दोन खासदार हे ठाकरे गटातून शिंदे गटात गेले आहे.
त्यामुळे या दोन जागांपैकी एका जागेवर गीतेंना संधी मिळू शकते. भाजपने कोकणात मिशन लोकसभा सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपकडे ताकदीचा उमेदवार नसल्याने शेतकरी कामगार पक्षाचे धैर्यशील पाटील यांना भाजपने प्रवेश देत या लोकसभा मतदारसंघाची तयारी सुरू केली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात २०१९ पूर्वी शिवसेनेचे अनंत गीते हे तीन वेळा निवडून आले आहेत.
मात्र, २०१९ च्या निवडणुकीत गीते यांचा अनपेक्षित पराभव होत सुनील तटकरे हे २५ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. आता भाजपने या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यामुळे आता भाजपने रायगड लोकसभा मतदारसंघाची तयारी सुरू केली आहे.
जाहिरात :