राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव भाजपात प्रवेश करणार, मुंबईत १९ ऑगस्टला होणार प्रवेश सोहळा; मंत्री नितेश राणे यांची घोषणा

Spread the love

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशांत यादव हजारो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार

प्रशांत यादव भाजपात प्रवेश करणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

चिपळूण- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस व रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिष्ठित नेते प्रशांत यादव लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाची औपचारिक घोषणा राज्याचे मत्स्य विभाग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कमंत्री नितेश राणे यांनी पिंपळी येथील वाशिष्ठी डेअरीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली.

नितेश राणे म्हणाले की, प्रशांत यादव रत्नागिरी जिल्ह्यातील मोठे नेतृत्व आहे. कार्यकर्ता म्हणून नाही, तर नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम केलं आहे, अनेकांना रोजगार दिला आहे. सहकाराच्या क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे असा नेता आमच्या पक्षात आला, तर निश्चितच आम्हाला फायदा होईल. भाजपात प्रशांत यादवांचा प्रवेश १९ ऑगस्ट रोजी नरिमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात होईल. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे यांनी सांगितले की, पालकमंत्री ना. उदय सामंत हे आमच्या मतदार संघातील ज्येष्ठ मंत्री आहेत. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, परंतु प्रशांत यादव यांनी योग्यता पाहून निर्णय घेतला. १९ तारखेला त्यांच्या प्रवेश सोहळ्यातून संघटना अधिक भक्कम होईल. त्यांचे कार्यकर्त्यांचे जाळं मोठं असून ते तळागाळापर्यंत पोहोचले आहेत.” आमदार शेखर निकम हे आपल्याच महायुतीत आहेत, याबाबत विचारले असता प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही स्वबळावर लढलो, तरच आमची ताकद वाढेल, असेही ते म्हणाले.

यावेळी उपस्थित माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, राजेश सावंत, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्यासह नेते आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते. नितेश राणे यांनी याशिवाय २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत यादव फक्त सहा हजार आठशे मतांनी पराभूत झाले होते, हे सांगत २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप निश्चितच विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला. राज्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रशांत यादवांच्या प्रवेशामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, या सोहळ्यासाठी राजकीय व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे.

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page