
*प्रतिनिधी | चिपळूण :* तालुक्यातील खेर्डी गावाने कधी काळी लोह उद्योगासाठी नाव कमावले, आता मात्र या गावाने खऱ्या अर्थाने ‘लोहपुरुष’ घडवला आहे. प्रशांत संभाजी दाभोळकर या खेर्डीतील तरुणाने कोल्हापूर येथे पार पडलेल्या प्रयत्न ट्रायथलॉन स्पर्धेत अफाट जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर ‘आयर्न मॅन’ हा प्रतिष्ठेचा किताब मिळवला आहे.
रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी कोल्हापूरमध्ये ही स्पर्धा पार पडली. देश-विदेशातील ३०० हून अधिक खेळाडू यात सहभागी झाले होते. अत्यंत कठीण अशी ही ट्रायथलॉन स्पर्धा म्हणजे स्विमिंग (१.९ किमी), सायकलिंग (९० किमी) आणि धावणे (२१.१० किमी) असा त्रिसंघर्षात्मक प्रकार असतो. ही स्पर्धा १० तासांच्या आत पूर्ण करणं ही अट असते. मात्र प्रशांत दाभोळकर यांनी ही अवघड शर्यत केवळ ७ तास ४६ मिनिटांमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करत खेर्डीचा आणि संपूर्ण चिपळूणचा अभिमान वाढवला आहे.
*कराटे प्रशिक्षक ते आयर्न मॅन – प्रेरणादायी प्रवास….*
प्रशांत दाभोळकर हे खेर्डी गावचेच रहिवासी असून माजी सरपंच दशरथ दाभोळकर यांचे बंधू आहेत. सुरुवातीला त्यांनी कराटे प्रशिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली. ते स्वतः ब्लॅक बेल्ट विजेते असून अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. शरीर सशक्त ठेवण्याची आवड असल्यामुळे त्यांनी विविध खेळात हात आजमावला.
२०२३ मध्ये त्यांनी सायकलिंग क्षेत्रात प्रवेश केला. पहिल्याच वर्षी त्यांनी १००० किमीची बी.आर.एम. (Brevets de Randonneurs Mondiaux) ही सायकलिंग स्पर्धा फक्त ७३ तासांत पूर्ण केली, आणि त्यानंतर १२०० किमीची एल.आर.एम. (Long-distance Randonneur) ही अजून कठीण स्पर्धा ८६ तासांत पार केली. या अद्वितीय कामगिरीमुळे त्यांना दोन वेळा ‘सुपर रँडोनर’ हा किताब मिळाला. याच कामगिरीची दखल घेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सायकलिंग क्लबने त्यांना ‘सायकल सम्राट’ या विशेष पुरस्काराने सन्मानित केले.
*अडचणींवर मात करत ध्येयपूर्ती….*
‘आयर्न मॅन’ बनण्याचे स्वप्न त्यांनी गेल्या वर्षीच पाहिले होते. परंतु त्या वेळी किरकोळ दुखापतीमुळे स्पर्धेत सहभागी होता आले नाही. मात्र त्यांनी हार मानली नाही. दुखापतीतून सावरल्यानंतर त्यांनी दैनंदिन सहा तास सराव करण्याचा संकल्प केला. वाशिष्टी नदी आणि चिपळूण नगर परिषदेच्या जलतरण तलावात पोहण्याचा विशेष सराव केला. धावणे ही पूर्वीपासून त्यांची ताकद होतीच, परंतु स्पर्धेसाठी त्यांनी दररोज ५० किमी सायकलिंग करणे सुरू ठेवले.
स्पर्धेपूर्वीचा संपूर्ण वर्षभराचा कठोर आणि शिस्तबद्ध सराव, आहार, वेळेचे नियोजन, तसेच कुटुंब आणि चिपळूण सायकलिंग क्लब यांचं सातत्यपूर्ण पाठबळ यामुळे त्यांनी ही अभूतपूर्व कामगिरी साध्य केली.
*गौरवाचा आणि प्रेरणेचा क्षण…*
स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर त्यांचा चार वेळा आयर्न मॅन किताब मिळवलेले प्रसिद्ध ट्रायथलॉनपटू गोंदू गुप्ते कृष्णा यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. खेर्डीसारख्या गावातून एका तरुणाने आंतरराष्ट्रीय पातळीची अत्यंत कठीण मानली जाणारी ही स्पर्धा केवळ यशस्वी रित्या पूर्ण केलीच, पण इतरांसाठी एक प्रेरणादायी उदाहरणही निर्माण केलं.
*पुढचं लक्ष्य ‘टायगर मॅन’….*
आपल्या भावनांना वाट मोकळी करताना प्रशांत दाभोळकर म्हणाले, “हा किताब केवळ माझा नाही. माझ्या कुटुंबाचा, माझ्या गावाचा, चिपळूण सायकलिंग क्लबचा आहे. आता पुढचं लक्ष्य आहे ‘टायगर मॅन’ स्पर्धा पूर्ण करून अजून एक मैलाचा दगड गाठण्याचं.”
*खेर्डी आणि चिपळूणचा अभिमान..*
प्रशांत दाभोळकर यांची ही कामगिरी ही केवळ एक वैयक्तिक यशकथा नाही, तर खेर्डी गावाला, चिपळूण तालुक्याला आणि संपूर्ण कोकणाला ‘होऊ शकतं’ अशी नवी दिशा देणारी गोष्ट आहे. एक मध्यमवर्गीय, ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेला खेळाडू जिद्दीने, मेहनतीने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने आंतरराष्ट्रीय दर्जाची कामगिरी करू शकतो, हे त्यांनी सिद्ध केलं आहे.
फोटो कॅप्शन: प्रशांत दाभोळकर यांना ‘आयर्न मॅन’ किताब प्राप्त केल्यानंतर चार वेळा आयर्न मॅन ठरलेले गोंदू गुप्ते कृष्णा यांच्या हस्ते गौरवित करताना.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*

