
देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी राजापूर नगरपरिषदेचे भूतपूर्व मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांची नियुक्ती झाली आहे. लवकरच ते आपल्या पदाचा पदभार स्विकारणार आहेत. प्रशासनावर कमांड असणारा व जनतेची कामे करणारा कर्तव्यतत्पर व कार्यक्षम तरूण अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.
प्रशांत भोसले हे मूळचे सांगली जिल्ह्यातील आहेत. यापूर्वी ते रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहिले आहेत. सध्या ते सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. राजापूर येथे सुमारे अडीच वर्षे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी आपल्या कार्यशैलीने प्रशासन चांगल्या पध्दतीने हाताळत कामाच्या माध्यमातून जनतेच्या मनात वेगळा ठसा उमटवला होता. अत्यंत प्रभावीपणे काम करताना त्यांनी शासनाच्या विविध योजना सहकाऱ्यांना सोबत घेत नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे काम केले. शहरात विविध विकासकामांच्या माध्यमातून शहराकरिता भरीव असे योगदान दिले.

आपल्या अडीच वर्षाच्या यशस्वी कार्यकाळानंतर त्यांची सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी बदली झाली होती. तेथून आता त्यांची थेट देवरूख नगरपंचायतच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. देवरूख नगरपंचायतचे मुख्याधिकारी तथा प्रशासक चेतन विसपुते यांची नाशिक येथे प्रशासकीय बदली झाल्याने हे पद रिक्त होते. आता त्यांच्याजागी प्रशांत भोसले यांची नियुक्ती झाली आहे. लवकरच ते देवरूख नगरपंचायतमध्ये रूजू होणार आहेत. मुख्याधिकारी चेतन विसपुते यांची बदली झाल्यानंतर देवरूख शहरातील विविध समस्यांनी डोके वर काढले आहे. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांनी तर वाहनचालकांसह जनता त्रस्त झाली आहे. नूतन मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांना या समस्येकडे प्राधान्याने लक्ष देवून ती समस्या मार्गी लावावी लागणार आहे.