
चिपळूण : गावोगावी भरणाऱ्या अशा संमेलनांमुळेच प्रांतिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनांना बळ मिळते. मराठी भाषेला समृद्ध करणार्या बोलीभाषा आणि ग्रामीण लोकसंस्कृती टिकवून ठेवण्यासाठी अशा ग्रामीण संमेलनांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्वर्यु प्रकाश देशपांडे यांनी केले.राजापूर लांजा नागरिक संघाचे दोन दिवसांचे आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन राजापूर तालुक्यातील तळवडे येथे सुरू झाले. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. संघाध्यक्ष सुभाष लाड यांनी साहित्य संमेलन भरविण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. स्वागताध्यक्ष आप्पा साळवी यांनी सांगितले की, गावातील तरुणांना रोजगार द्यायलाही हे संमेलन यशस्वी ठरेल, अशी खात्री आहे.

राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ही अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणारी संस्था गेल्या सात वर्षांपासून या दोन तालुक्यांच्या ग्रामीण भागांमध्ये अनोखे साहित्य संमेलन भरवत आहे. राजापूर तालुक्यातील तळवडे या निसर्गसंपन्न गावी आठवे साहित्य संमेलन सुरू झाले. सभामंडप भरलेला असला तरी व्यासपीठावर मात्र एकही खुर्ची ठेवली जात नाही, हे या संमेलनाचे वैशिष्ट्य यावर्षीही जपण्यात आले.
जाहिरात :
