चंद्रावर फिरताना प्रज्ञान रोव्हरसमोर आला भलामोठा खड्डा; प्रज्ञान रोव्हरने मार्ग बदलला; इस्रोकडून प्रज्ञान रोव्हरचे फोटो शेअर
श्रीहरीकोटा- चांद्रयान-३ चे चंद्रावर यशस्वीरित्या लँडिंग झाल्यानंतर या मोहिमेअंतर्गत ‘प्रज्ञान रोव्हर’ १४ दिवस चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फिरणार आहे. या माध्यमातून इस्रोच्या शास्त्रज्ञांना चंद्रावरील वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावण्यास मदत होत आहे. अशामध्ये प्रज्ञान रोव्हरच्या चंद्रावरील प्रवासाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. इस्रोकडून प्रज्ञान रोव्हरचे आजचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
चंद्रावर फिरताना प्रज्ञान रोव्हरसमोर एक भला मोठा खड्डा आला. चंद्राच्या पृष्ठभागावर प्रज्ञान रोव्हरच्या समोर ४ मीटरचा खड्डा आला. पण इस्रोने सुरक्षितपणे या रोव्हरला नवीन मार्गावर नेले. इस्रोने सोमवारी प्रज्ञान रोव्हरचे आणखी काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत इस्रोने, रविवारी प्रज्ञान रोव्हर एका मोठ्या खड्ड्याजवळ पोहोचले होते. पण त्याला सुखरूपरित्या बाजूला करण्यात आले असून आता ते नवीन मार्गावरुन पुढे जात आहे.
इस्रोने आज सोमवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन प्रज्ञान रोव्हरचे फोटो शेअर करत सांगितले की, ‘२७ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ मोहिमेचे प्रज्ञान रोव्हर त्याच्या स्थानाच्या ३ मीटर पुढे ४ मीटर व्यासाच्या क्रेटरवर (म्हणजेच खड्डाजवळ) पोहोचले. त्यानंतर प्रज्ञान रोव्हरला परत येण्याची कमांड देण्यात आली. आता प्रज्ञान रोव्हर सुरक्षितपणे नवीन मार्गावरून पुढचा प्रवास करत आहे.
त्यापूर्वी काल रविवारी इस्रोने चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरशी जोडलेल्या चेस्ट पेलोडच्या चंद्राच्या पृष्ठभागावर मोजलेल्या तापमानातील फरकाचा आलेख प्रसिद्ध केला होता. इस्रोने माहिती दिली होती की, आलेखात शोध मोहिमेदरम्यान नोंदवल्याप्रमाणे चंद्राच्या पृष्ठभागावर किंवा पृष्ठभागाच्या तापमानातील भिन्नता दर्शवितो. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबद्दल अशी ही पहिलीच माहिती आहे. त्याचा सविस्तर अभ्यास अजून सुरु आहे. ChaSTE पेलोड खोलवर जात असताना इस्रोने जारी केलेला आलेख चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील चढउतार आहे.