
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. मलिक यांना दोन महिन्यांसाठी हा जामीन दिला आहे. अंडरवर्ल्डशी संबध असल्याचं कथित प्रकरण आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मलिक हे गेल्या दिड वर्षांपासून तुरुंगात आहेत. दरम्यान, या जामीनावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, मलिक यांना १६ महिन्यांनी वैद्यकीय कारणांमुळे जामीन मिळाला आहे. यामुळे आम्हा सगळ्यांना आनंद झाला आहे.

संजय राऊत म्हणाले, तुरुंगात असलेल्या एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय कारणांसाठी जामीन दिला जातो. यासाठी आपल्या देशात कायदा आहे. परंतु, हे (भाजपा सरकार) त्या कायद्यानुसार आपल्या राजकीय विरोधकांना जामीनच देत नाहीत. विरोधकांना अडकवण्यासाठी त्यांची ही सगळी कारस्थानं सुरू आहेत. अनिल देशमुख असतील, मी असेन, नवाब मलिक असतील या सगळ्यांना अडकवण्याची कारस्थानं सुरू आहेत. हसन मुश्रीफ यांनी ते नवीन इंजेक्शन घेतल्यामुळे ते सुटले. त्यात प्रफुल्ल पटेलही आहेत.
खासदार संजय राऊत म्हणाले, काल म्हणे केंद्र सरकारने देशद्रोहाचा कायदा रद्द केला. तो ब्रिटीशकालीन कायदा होता. परंतु, तुम्ही (भाजपा सरकार) त्या कायद्याला मागे टाकणारे कायदे वापरून तुमच्या राजकीय विरोधकांना गुंतवताय, अडकवताय. राजकीयदृष्ट्या ज्यांचा आपल्याला भविष्यात त्रास होईल, अशा अनेक कार्यकर्त्यांना तुम्ही तुरुंगात टाकताय. त्यामुळे देशद्रोहाचा कायदा रद्द केल्याचं कौतुक सांगू नका. ब्रिटीशांपेक्षा भयंकर कायदे तुम्ही रद्द केले आहेत. ते कायदे तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांना जेरीस आणण्यासाठी वापरताय.
खासदार संजय राऊत म्हणाले, जे लोक तुमच्या पक्षात (भाजपा) येतील त्यांना तुम्ही निर्मला वॉशिंग मशीनमध्ये टाकून धुताय. महाराष्ट्रात बघा काय चाललंय? नवाब मलिक १६ महिन्यांनी सुटले पण जे तुरुंगाच्या वाटेवर होते, त्यांना तुम्ही अशाच खटल्यात मंत्री केलं आहे. त्यासाठी अशाच प्रकारचे कायदे वापरले. आपल्या देशात जे काही चाललंय ते देश हुकूमशाहीकडे चालल्याचं लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही तो देशद्रोहाचा कायदा रद्द केलाय त्याची टिमकी वाजवू नका.