गुहागर l 19 नोव्हेंबर- तालुक्यातील अंजनवेल जेट्टीवरून होणाऱ्या डिझेल तस्करीचा पर्दाफाश गुहागर पोलिसांनी केला. डिझेल तस्करी करणाऱ्या नऊजणांना रविवारी मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले. २५ हजार लिटर डिझेलसह २ कोटी ५ लाख ९५ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. गुहागरमधील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
अंजनवेल येथे समुद्रामार्गे रविवारी रात्री डिझेल तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अंजनवेल जेट्टीकिनारी मध्यरात्री १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान एक मच्छीमारी बोट पोलिसांना दिसली. पोलिसांनी या बोटीची तपासणी केली असता डिझेलचा साठा सापडला. चौकशीत हा साठा अवैध असल्याचे समोर आले. या बोटीवर डिझेल टँकरमध्ये पंप व पाइप सापडले. तस्करीसाठी वापरलेली बोट, पंप व पाइप, टैंकर (एमएच ४६ – बीएम ८४५७), कार (एमएच ४६ बीके २५६८) तसेच २५ हजार लिटर डिझेल, नऊ मोबाइल फोन गुहागर पोलिसांनी जप्त केले आहेत. बोटीवरील नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे, गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत व कर्मचारी, तालुका पुरवठा अधिकारी पेंडसे यांनी ही कारवाई केली.