
देवरूख- सासरे घरातील कामे करण्यासाठी सांगतात याचा राग सुनेने मनात धरून जेवणामध्ये विषारी द्रव्य टाकून सासऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब रेवाळेवाडी येथे घडली आहे. सासऱ्यासह पतीला देखील या विषाची बाधा झाली असून त्यांच्यावर रत्नागिरी येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सुनेवर देवरूख पोलीस ठाण्यात आज शुक्रवारी गुन्हा दाखल करून तीला अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे संगमेश्वर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सचिन जगन्नाथ सोलकर (वय ३४ वर्षे) यांनी फीर्याद दिली आहे. स्वप्नाली सचिन सोलकर (वय ३२ वर्षे) असे आरोपी महिलेचे नाव आहे. सचिन सोलकर व स्वप्नाली सोलकर यांचा १३ एप्रिल २०२५ रोजी विवाह झाला. स्वप्नाली हीला सासरे जगन्नाथ सोलकर हे घरातील कचरा काढणे, साफसफाई करणे व इतर कामे चांगल्या प्रकारे करण्यास सांगायचे. याचा राग स्वप्नाली हीने मनात धरून जगन्नाथ सोलकर यांना जीवे ठार मारण्यासाठी चक्क जेवणामध्ये विषारी द्रव्य मिसळल्याचे सचिन सोलकर याने फीर्यादीत नमुद केले आहे. यातील जेवण सचिन सोलकर याने खाल्याने त्याला देखील विषबाधा झाली आहे. ही घटना २२ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता घडली.
जगन्नाथ सोलकर व सचिन सोलकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना प्रथम देवरूख ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान जगन्नाथ सोलकर व सचिन सोलकर यांना विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. दोघांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दिलेल्या फीर्यादीनुसार स्वप्नाली सोलकर हीच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करून पोलीसांनी ताब्यात देखील घेतले आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी व पंचनामा केला. याप्रसंगी देवरूख पोलीस निरीक्षक उदय झावरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत मसुरकर, हे. काँ. सचिन पवार, हे. काँ. सचिन कामेरकर, सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल मंजुश्री पाडावे आदी उपस्थित होते.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर…..