
पुणे- स्वारगेट बस स्थानकातील तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्ता गाडे याचा शोध घेण्यास पुणे पोलिसांना अखेर यश आले आहे. गाडे याला त्याच्याच गावात असलेल्या एका शेतातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर गाडे हा आपल्या गुणाट या गावी आला होता.
महाशिवरात्री असल्याने तो तिथल्या कीर्तन कार्यक्रमात देखील सहभागी झाला होता. मात्र माध्यमांवर त्याचा फोटो आल्यानंतर तो तिथून फरार झाला होता. गावकऱ्यांनी त्याला गावात आल्याचे पाहिले होते. त्यानुसार पोलिसांच्या 13 पथक त्याचा शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आली होती. श्वान पथक, ड्रोनच्या माध्यमातून त्याचा शोध सुरु होता. गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरु होता. पोलिसांनी दिवसभर शोधा ध करून देखील तो सापडला नव्हता. मात्र मध्यरात्री दीडच्या सुमारास तो पोलिसांना सापडला. बलात्कारच्या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यकक्षामतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, दोन दिवसांच्या शोध मोहिमेला अखेर यश आले आहे.
त्याला पकडल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याला पुण्यात आणण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांच्या हाताला लागला. त्याला घेऊन पोलिसांचे पथक आता पुण्याच्या दिशेने निघाले आहे. दत्ता गाडे याने अजून काही कांड केले आहेत का? याचा उलगडा देखील आता होणार आहे. स्वारगेट सारख्या माहत्वाच्या ठिकाणी ही घटना घडल्याने सर्वांनाचं धक्का बसला होता. यामुळे महिलांची सुरक्षितता पुन्हा एकदा वाऱ्यावर असल्याचे पहायला मिळाले आहे. तरुणीने योग्य वेळी तक्रार दाखल केल्याने या प्रकरणाला वाचा फुटली होती. त्यामुळे दत्ता गाडे सारख्या सराईत आरोपीला पकडणे शक्य झाले. आरोपीला आज दुपारी तीननंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपीला सध्या लष्कर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.