डिजीटल दबाव वृत्त
पुणे : मुळशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक एक आणि दोनसाठी वाढीव पाणी मिळावे यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी नऊ फेब्रुवारीला होणार असून सेनापती बापट जलाशयातून वाढीव पाणी मिळणार का याकडे सर्व मुळशीकरांचे लक्ष लागले आहे.
मुळशी प्रादेशिकच्या पहिल्या टप्प्यात २८ गावे आणि वाड्यावस्त्यांवर पाणी पोचले. तथापि कोळवण खोऱ्यातील आणि माण-हिंजवडी परिसरातील गावांनाही मुळशी धरणातून पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने मुळशी प्रादेशिकच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव तयार केला.
या प्रस्तावाद्वारे २०३९ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून टप्पा एकसाठी ७.३६ आणि टप्पा दोनसाठी १५.३६ दशलक्षघनमीटर इतक्या वाढीव पाण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावास शासनाकडून तांत्रिक मान्यता तसेच प्रशासकीय मान्यता मिळाली. या कामाची निविदा प्रक्रीया पूर्ण केली असून ठेकेदारास काम करण्याचे आदेश दिले आहेत.
वळणे येथे बोगद्याची लांबी जलाशयापर्यंत वाढविल्यास मे-जून महिन्यात देखील पाणी पुरवठा सूरू ठेवता येईल. एकंदर मुळशीतील २४ गावे, हिंजवडीतील १३ गावे आणि कोळवणमधील ११ गावांसाठी राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या पाण्यामुळे सुमारे ५०
गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल, असे याचिकेत नमूद आहे.
संभवे बोगद्यातून पाणी उपसणे शक्य
मुळशी टप्पा एकसाठी वाढीव मागणी आणि टप्पा दोनमधील कोळवण खोऱ्यातील गावे अशी एकूण पाणी मागणी ”मुळशी मध्यम बोगदा” प्रकल्पातील शिल्लक पाण्यातून पूर्ण करता येणे शक्य आहे. हे पाणी संभवे येथील बोगद्याद्वारे मुळा नदीत सोडण्यात येते. मुळा नदीत जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले असून या बंधाऱ्यातून पाण्याचा उपसा करणे शक्य आहे, असे कंपनीने कळविले आहे. जलसंपदा विभागाने देखील या प्रकल्पातून दहा दलघमी पाणी शिल्लक असल्याचे कळविले आहे.
जाहिरात


