शारदीय नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची विधीपूर्वक पूजा केली जाते. या दिवशी हवन आणि कन्या पूजनानं देवीला निरोप देण्याची परंपरा आहे. देवी सिद्धिदात्रीची पूजा केल्यानं सर्व संकटं दूर होतात.
मुंबई- आज शारदीय नवरात्रीचा नववा दिवस आहे. आज देवी दुर्गेचं नववं रूप सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाणार आहे. देवी सिद्धिदात्रीची उपासना केल्यानं मनुष्याला सर्व संसारिक सुखांची प्राप्ती होते असं मानलं जातं. यासोबतच त्याला ज्ञान, बुद्धी, संपत्ती, ऐश्वर्य इत्यादी सर्व सुख-सुविधाही मिळतात. नवरात्रौत्सवाच्या नवव्या दिवशी कन्येची पूजा करून अनेकजण नऊ दिवसांचे उपवास सोडतात. या दिवशी हवन आणि आरतीनं या विशेष उत्सवाची सांगता होते. जाणून घेऊया देवी सिद्धिदात्रीचे रूप, पूजा पद्धत आणि रंग.
देवी सिद्धिदात्रीचं रूप :
देवी सिद्धिदात्री देवी लक्ष्मीप्रमाणं कमळावर विराजमान आहे. तिला चार हात आहेत, त्या प्रत्येकामध्ये एक शंख, चक्र आणि कमळाचं फूल आहे. शास्त्रानुसार देवी सिद्धिदात्री ही अणिमा, इशित्व, वशित्व, लघिमा, गरिमा, प्राकाम्या, महिमा आणि प्राप्ती या आठ सिद्धींची देवी आहे. माता सिद्धिदात्रीची पूजा केल्यानं या सर्व सिद्धी प्राप्त होतात.देवी
सिद्धिदात्रीच्या पूजेची पद्धत :
देवी सिद्धिदात्रीची पूजा करण्यापूर्वी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून ध्यान करून पूजास्थान स्वच्छ करावे. यानंतर पूजास्थानाला गंगाजलानं स्वच्छ करून घ्यावे. त्यानंतर देवी सिद्धिदात्रीला फुले, हार, सिंदूर, सुगंध, अक्षत इत्यादी अर्पण करा. तसेच तीळ आणि त्यापासून बनवलेल्या वस्तू अर्पण करा. या दिवशी तुम्ही देवीला मालपुवा, खीर, हलवा, नारळ इत्यादी अर्पण करू शकता. यानंतर देवी सिद्धिदात्री स्तोत्राचे पठण करा आणि अगरबत्ती लावून देवीची आरती करा. आरतीपूर्वी दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालिसाचे पठण करायला विसरू नका.
कन्या पूजा आणि हवन :
नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी देवीला निरोप देताना मुलीची पूजा आणि हवन करण्याची पद्धत शास्त्रात सांगितली आहे. हवन केल्यावरच उपवासाचं फळ मिळतं असं मानलं जातं. म्हणून दुर्गादेवीची पूजा केल्यानंतर हवन करावं. असं केल्यानं सर्व दु:ख आणि वेदना दूर होतात आणि देवी सिद्धिदात्रीची कृपा भक्तांवर सदैव राहते.नवरात्रीचा
नववा दिवस – (मोरपंखी) :
23 ऑक्टोबर रोजी महानवमीच्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाईल. मोरपंखी हिरवा रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्यानं दोन्ही रंगांच्या गुणांचा (समृद्धी आणि नवीनता) फायदा होतो.