वेंगुर्ला तालुक्यासह मतदार संघाच्या अनेक भागात जोरदार प्रचार..
वेंगुर्ला/प्रतिनिधी: माझी निशाणी “गॅस शेगडी”असून ती अन्न बनवण्याचे पवित्र कार्य करते, आज ही निशाणी घरा घरात पोहचत असून आपला हक्काचा माणूस म्हणून मिळत असलेला प्रतिसाद अभूतपूर्व असल्याचा दावा अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी केला. त्यांनी वेंगुर्ला व मतदार संघाच्या इतर भागात जोरदार प्रचार सुरु आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल परब हे सध्या वेंगुर्ले तालुक्यात घरोघरी जाऊन प्रचार करून मतदारांपर्यंत पोहचत आहेत.त्यांना युवा वर्गाचा तसेच गोरगरिबांचा प्रतिसाद लाभत आहे. अवघ्या काही दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली आहे.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत असल्याने या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजपाचे बंडखोर उमेदवार विशाल परब हे अपक्ष उमेदवार म्हणून मतदार संघात उभे आहेत.कोणत्याही मोठ्या सभा नाही, मोठा बडेजाव नाही. पण शांत पणे ते आपला प्रचार करत आहेत. आपल्या युवा सहकाऱ्यांसोबत घरोघरी जाऊन या मतदारसंघात विकासात्मक बदल करण्यासाठी आपण उमेदवार म्हणून रिंगणात आहोत त्यामुळे आपल्याला एक संधी द्या,असे आवाहन ते मतदारांना करत आहेत. आणि आपली “गॅस शेगडी” निशाणी घरोघरी पोहोचवत आहेत. त्यांच्या प्रचारालाही वेंगुर्ले तालुक्यात गावागावात चांगला प्रतिसाद मिळत आहे.