ठाणे निलेश घाग : येथील पूर्व भागातील डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील रेल्वेच्या स्वच्छता गृहांचा वापर फेरीवाले साहित्य ठेवण्यासाठी करत आहेत. यामुळे प्रवाशांना स्वच्छता गृहांमध्ये जाताना अडथळे पार करावे लागत आहेत.
स्वच्छतागृहांचे नियंत्रण रेल्वे अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा बळाच्या अधिकाऱ्यांचे या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. डोंबिवली पूर्व भागात सर्वाधिक फेरीवाल्यांची वर्दळ आहे. पालिकेकडे आवश्यक कारवाई पथक, पोलीस बळ असतानाही त्यांना फेरीवाले हटविता येत नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
फेरीवाले सकाळीच विक्रीसाठी लागणाऱ्या सामानाचे गठ्ठे घेऊन डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात येतात. पालिकेच्या ग आणि फ प्रभागा कडून फेरीवाले हटविण्याची मोहीम सुरू असून त्यात पथक सामान जप्त करते. यामुळे सामान सुरक्षित राहावे म्हणून फेरीवाले अर्धे सामान रेल्वेच्या स्वच्छता गृहांमध्ये लपून ठेवतात. विक्रीसाठी जितके सामान लागेल, त्याप्रमाणे ते काढून घेतात आणि उर्वरित स्वच्छता गृहांमध्येच ठेवतात. डोंबिवली पूर्वेत ग आणि फ प्रभाग येतात.
ग आणि फ प्रभागाने दोन्ही प्रभागांमध्ये संयुक्त कारवाई करून फेरीवाल्यांचा कायमचा बिमोड करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे
फेरीवाले हटविण्यासाठी उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एक मध्यवर्ती फेरीवाला हटाव पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकातील काही कामगार स्थानिक फेरीवाला हटाव पथकाला विश्वासात न घेता कारवाई करत होते. त्यामुळे प्रभागात वादावादीचे प्रकार सुरू झाले होते. मध्यवर्ती फेरीवाला हटाव पथकातील नऊ कामगारांचा ताफा, पोलीस बळ डोंंबिवलीतील ग, फ प्रभागातील अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिला तर संयुक्त कारवाईतून स्थानिक अधिकारी डोंबिवली पूर्वेचा फेरीवाल्यांचा प्रश्न कायमचा निकाली लावण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात डोंबिवली पूर्वेत फेरीवाल्यांनी फेरीवाला हटाव पथकावर हल्ला केला. काही कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. अशाही परिस्थितीत ग प्रभागाचे फेरीवाला हटाव पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे, विलास साळवी यांनी ग प्रभाग साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांच्या आदेशावरून फेरीवाल्यांची गय न करता त्यांचे सर्व सामान जप्त केले. मध्यवर्ती पथकातील कामगार ग, फ प्रभागात एकत्रितपणे द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून आयुक्तांकडे केली जाणार आहे.
जाहिरात