पनवेल: बहुचर्चित बेलापूर उरण लोकल सेवा सुरू झाल्याने उरण परिसर नवी मुंबई शहराशी जोडला गेला आहे. परंतु हिच सेवा पनवेल पर्यंत असावी व पनवेल उरण रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.बेलापूर- उरण दरम्यान ता.12 जानेवारीपासून लोकल धावायला सुरवात झाली. गेल्या कित्येक वर्षभरापासून रखडलेली उरण ते बेलापूर लोकल सेवा अखेर सुरु झाली आहे. अनेक दिवसांपासून उरण शहरात मुंबई लोकल सेवा पुरवण्यात यावी, अशा मागणींनी जोर धरला होता. नवी मुंबईच्या स्थापनेनंतर अनेक दशकांपूर्वी सीएसएमटी ते बेलापूर लोकल सेवा सुरू करण्यात आली.
मात्र, बेलापूरपासून उरण असा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यामुळे बेलापूर ते उरण अशी लोकल सुरु करण्यात यावी, अशा मागणींनी जोर धरला होता. यानंतर मुंबई लोकल प्रशासनाने बेलापूर उरण अशी लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. अखेर 12 जानेवारी रोजी सीएसएमटी ते उरण लोकल सेवा सुरु झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.परंतु जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट व परिसरात असलेले उद्योगधंदे या मध्ये पनवेल मधून मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ काम करत आहे. या मध्ये ड्रायव्हर माथाडी पासून ते वरिष्ठ अधिकार्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. पनवेल मधून थेट पळस्पा जेएनपिटी मार्गावर पब्लिक ट्रान्सपोर्ट ची व्यवस्था नसल्याने पनवेल परिसरातील नागरिकांना उरण ला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
कंटेनर यार्ड मधील कामगारांना गट करून खाजगी वाहनाने कर्तव्याच्या ठिकाणी जावे लागत असल्याने त्यांचा वेळ व पैशाचा अपव्यय होत आहे. तसेच बहुतेक कामगार हे दोन दोनच्या संखेने आपल्या मार्गानुसार दुचाकीवरून जात आहेत. सद्यःस्थितीत पळस्पे न्हावाशेवा महामार्गाचे काम पूर्ण झाल्याने हा मार्ग वेगवान झाला आहे. त्या मुळे या मार्गावर नेहमी दुचाकी व चारचाकीचे भीषण अपघात होऊन आजतागायत शेकडो कामगारांचे प्राण गेले आहेत. त्या मुळेच पनवेल वरून थेट उरण लोकल सुरू करावी अशी मागणी येथील जेएनपिटी बंदरात काम करणार्या नागरिकांनी केली आहे.