मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने गुढीपाडव्याच्या दिवशी, बुधवारी रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवल्या. त्यामुळे बुधवारी मध्य आणि हार्बर मार्गावरील अनेक लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. गुढीपाडव्यानिमित्त सुट्टी असल्याने अनेक नागरिक नातेवाईकांकडे जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र रेल्वेने वेळापत्रकात फेरबदल केल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली.
गुढीपाडव्यानिमित्त सरकारी, निमसरकार कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुट्टी होती. सुट्टी असल्यामुळे अनेकांनी बाहेर फिरायला जाण्याचे बेत आखले होते. मात्र, बुधवारी मध्य रेल्वेवर रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकलच्या फेऱ्या होत होत्या. परिणामी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तसेच, मध्य रेल्वेवरील मुख्य मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे कुटुंबियांसह घराबाहेर पडलेल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
मध्य रेल्वेच्या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अनेक स्थानकांत नियोजित वेळापत्रकानुसार लोकल २० ते ३० मिनिटे विलंबाने धावत होत्या. तसेच, लाल सिग्नल मिळाल्याने दोन स्थानकांदरम्यान धीम्या आणि जलद लोकलचा बराच वेळ खोळंबा झाला होता. दरम्यान, लोकल उशिराने धावत असल्याचे आणि रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवण्यात येत असल्याची उद््घोषणा मध्य रेल्वेच्या बहुतांश स्थानकांत करण्यात येत होती.