“मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ.डी.’वर यांची वाईट नजर आहे. पण बुरी नजर वाले तेरा मुंह काला. आम्ही ‘काला’ करणार म्हणजे करणारच! कोणीही असू द्या. मोदी असले तरी महाराष्ट्रात बाळासाहेबांशिवाय मतं मिळू शकत नाहीत हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर मोदींच्या नावानं मतं मागून दाखवा. तुम्ही मोदींचा फोटो लावा; आम्ही बाळासाहेबांचा फोटो लावतो; बघू महाराष्ट्र कोणाच्या बाजूने जातो. एकदा आमनेसामने’ होऊनच जाऊ द्या,” असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.
“स्वतःला ‘मोदी का आदमी’ म्हणवता मग चेहरा बाळासाहेबांचा का वापरता?”, असा खणखणीत सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्ला चढवला. भाजपा आणि मिंध्यांमध्ये निवडणुकीला सामोरे जायची हिंमतच नाही, अशी तोफही त्यांनी डागली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ९७वा जन्मदिन आणि दैनिक ‘सामना’च्या वर्धापन दिनानिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित शिवसैनिकांच्या विराट मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली.
मुदत संपल्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचे काय होणार असा प्रचार केला जात आहे. त्यावर बोलताना “माझ्या पक्षप्रमुख पदाचे काय होणार हे शिवसैनिक ठरवतील, तुम्ही कोण आहात?” असा खणखणीत सवाल त्यांनी यावेळी केला. “शिवसेनाप्रमुख जे सांगायचे तेच मी सांगतो. जोपर्यंत लाखो-करोडो शिवसैनिक माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी पक्षप्रमुख आहे. ज्या दिवशी तुम्ही सांगाल तेव्हा मी खाली उतरेन.” असे त्यांनी सांगितले.