रायगड- रायगड मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे ही घटना घडली आहे.या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विषबाधा झालेले विद्यार्थी नाशिकमधील रहिवासी आहेत. त्यांच्या शाळेची सहल प्रतापगड, रायगडला आली होती. सहलीला गड फिरण्यासाठी ही मुलं फार उत्सुक होती. विद्यार्थ्यांनी संपूर्ण गड पाहिला तसेच येथील इतिहासाची माहिती जाणून घेतली.
त्यानंतर ३० जानेवारीला रात्रीचं जेवण केलं आणि मुलं झोपली. मात्र रात्रीतूनच विद्यार्थ्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागला. शिक्षकांना ही माहिती समजताच त्यांनी आज सकाळी विद्यार्थ्यांना उपचाराकरता पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. उपचार केल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती ठिक असल्याने डॉक्टरांनी डिसचार्ज दिला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील घडला होता असाच प्रकार…
डिसेंबर महिन्यात देखील अशीच एक घटना समोर आली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेतील जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. शाळेलीत ४० विद्यार्थी आणि २ शिक्षकांना भोजनातून विषबाधा झाली होती. शालेय समितीने या घटनेकडे दुर्लक्ष केल्याने सरकारकडून शाळेची मान्यता रद्द झाली होती.