
*चिपळूण :* मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत परशुराम घाटातील धोकादायक दरडीच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांच्या कामांना गती मिळाली असताना गेले तीन दिवस कोसळत असलेल्या मान्सून पूर्वने ब्रेक लागला आहे. धोकादायक दरडीच्या ठिकाणी सुरू असलेले लोखंडी जाळी ठोकण्याचे काम आणि गॅबियन वॉल उभारणीच्या कामांत गेले तीन दिवस कोसळत असलेल्या पावसाने खोडा घातला आहे.
धोकादायक दरडीच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून लोखंडी जाळी बसवली जात आहे. लोखंडी जाळी बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून पावसाळ्यापूर्वी ते काम पूर्णत्वास जाण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.तर दुसरीकडे गेल्या पावसाळ्यात कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबियनवॉल उभारण्याचे कामदेखील वेगाने सुरू केले आहे. सिमेंट काँक्रिटीकरणाचा पाया तयार करून त्यावर जाळीच्या साहाय्याने दगडी बांधकामाची रचना केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी हे कामही मार्गी लावण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.