रत्नागिरी, दि.17 (जिमाका):- येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कॅम्पस इंटरव्ह्यूवप्रमाणे उद्या गुरुवार १८ जुलै रोजी रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या रोजगार इच्छुक युवक युवतींसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकतामार्फत आज एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.
यावेळी फिनोलेक्स अकॅडमी अँन्ड मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीजचे प्राध्यापक प्रतीक कांबळे व प्रभारी कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार, BTRI सुधीर कांबळे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले.
प्राध्यापक प्रतीक कांबळे यांनी उमेदवारांना प्रात्यक्षिकाद्वारे मुलाखतीस कसे सामोरे जावे, मुलाखतीसाठी रिझ्युम कसा तयार करावा याबाबतची माहिती दिली. तर सुधीर कांबळे यांनी शिकाऊ उमेदवारी कायदा याबाबत मार्गदर्शन केले.
सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती दिली. रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या खासगी आस्थापना व त्यांच्याकडे असणाऱ्या रिक्त पदांची माहिती दिली व रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती शेख यांनी केले. या कार्यशाळेस 108 उमेदवार उपस्थित होते.