पंढरपूर- कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरी नगरी सज्ज झाली असून, आज कार्तिक शुद्ध दशमीला शहरात सात लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. दरम्यान, आज सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरने पंढरपूर येथे दाखल होतील. तसेच, उद्या पहाटे त्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न होणार आहे. सोबतच, मंदिराला 700 वर्षापूर्वीचे पुरातन रूप देण्याच्या मंदिर विकास आराखड्याचा नारळ देखील फडणवीस यांच्या हस्ते फोडण्याची तयारी मंदिर प्रशासनाने केली आहे. त्यामुळे, 73 कोटीच्या या आराखड्याच्या कामांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.
▪️उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्या विठूरायाची महापूजा होणार आहे. तर, उपमुख्यमंत्री आपल्या दौऱ्यात पंढरपूर विकासाच्या 2700 कोटीच्या प्रकल्पाबाबत आणि कॉरिडॉरबाबत काय घोषणा करणार हे पाहावे लागणार आहे. तसेच, पंढरपूरमध्ये दाखल झाल्यावर आज उपमुख्यमंत्री फडणवीस हे मराठा समाजाच्या शिष्ठमंडळाशी चर्चा करणार आहे. यासोबतच, धनगर समाज आणि आदिवासी कोळी समाजाच्या शिष्ठमंडळाकडून देखील फडणवीस यांची भेट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे.
🔸️असा असेल मंदिरातील कार्यक्रम-
▪️उद्या पहाटे 2 वाजून 10 मिनिटे ते 2 वाजून 20 मिनिटापर्यंत गाभारा व सोळखांबी स्वच्छता करण्यात येईल
▪️पहाटे 2 वाजून 20 मिनिटे ते 3 वाजेपर्यंत उपमुख्यमंत्री व मानाचा वारकरी यांच्या हस्ते विठ्ठल पूजा केली जाईल
▪️पहाटे 3 ते 3 वाजून 30 मिनिटापर्यंत उपमुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या हस्ते रुक्मिणी मातेची पूजा केली जाईल
▪️पहाटे 3 वाजून 5 मिनिटांनी देवाच्या पदस्पर्श रांगेची सुरुवात होईल
▪️पहाटे 3 वाजून 30 मिनिटे ते पहाटे 4 वाजून 30 मिनिटेपर्यंत 73 कोटीच्या मंदिर विकास आराखडा भूमिपूजन होईल.
🔸️भूमिपूजननंतर उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी यांचा मंदिराच्या वतीने सत्कार करण्यात येईल..
▪️कार्तिकीला येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराला पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांच्याकडून 5 टन फुलांच्या सजावटीचे काम सुरु झाले आहे. सध्या दर्शन रांग गोपाळपूर येथील 10 पत्राशेडमध्ये असून, भाविकांना दर्शनाला बारा तासांचा अवधी लागत आहे. मात्र, असे असले तरीही विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांमधील उत्साह कणभरही कमी होताना दिसत नाही.