सिडनी :- भारताच्या ४३ वर्षीय रोहन बोपन्नाने शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एडबेनसह जेतेपद पटकावले. ४३ व्या वर्षी दुहेरीत ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. २०१८ मध्ये त्याने फ्रेंच खुल्या स्पर्धेत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले होते.
वयाच्या ४३व्या वर्षी रोहन बोपन्नाने जागतिक क्रमवारीत नंबर १ स्थान पटकावले आणि असा पराक्रम करणारा तो वयस्कर खेळाडू ठरला; शिवाय कोणत्याही ग्रँड स्लॅम स्पर्धेत दुहेरीची फायनल गाठणारा तो वयस्कर खेळाडू आहे. रोहन बोपन्ना व मॅथ्यू एडबेन यांच्या समोर यशस्वी जोडी सिमोन बोलेल्ली व आंद्रीया व्हॅवासोरी यांचे आव्हान होते. बोपन्नाला नुकताच देशातील चौथा सर्वोत्तम पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे आणि त्यामुळे अंतिम सामन्यापूर्वी त्याचे मनोबल नक्की उंचावले असेल. पहिल्या सेटमध्ये त्याची प्रचिती पाहायला मिळाली. बोपन्ना युवा प्रतिस्पर्धींना अनुभवाचा जोरावर बॅकफूटवर फेकत होता. पण, तरीही हा सेट ६-६ असा बरोबरीत आला आणि टायब्रेकरमध्ये बोपन्नाने सहकारी एडबेनसह प्रतिस्पर्धींना ७-० असे भिरकावून दिले. बोपन्ना- एडबेन या जोडीने पहिला सेट ७-६ ( ७-०) असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही जोडींकडून दमदार खेळ पाहायला मिळाला. आपापल्या सर्व्हिसमध्ये गेम घेत हा सेट ५-५ असा बरोबरीत आला होता. ११व्या गेममध्ये बोपन्ना व एडबेन या जोडीने इटलीच्या खेळाडूंची सर्व्हिस ब्रेक केली आणि ६-५ अशी निर्णायक आघाडी घेतली. आता त्यांना त्यांच्या सर्व्हिसमध्ये बाजी मारून हे जेतेपद नावावर करायचे होते. बोपन्नाने सर्व अनुभव पणाला लावताना हा गेम जिंकला आणि दुसरा सेट ७-५ असा नावावर करून ग्रँड स्लॅम जेतेपदाचा दुष्काळ वयाच्या ४३व्या वर्षी संपवला.