जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | मे ०१, २०२३.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागातर्फे इयत्ता दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन येत्या ५ मे रोजी रत्नागिरीत करण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांना दहावी व बारावीनंतर कोणत्याकोणत्या करिअर संधी आहेत, याची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस. जी. कोतवडेकर आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहाय्यक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हे शिबिर मारुती मंदिर येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने पुढाकार घेऊन हे शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरामध्ये दहावी, बारावीनंतरचे विविध अभ्यासक्रम व रोजगाराच्या संधी याबाबत या क्षेत्रातील वक्त संदेश रहाटे व भास्कर जाधव मार्गदर्शन करणार आहे. केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर कौशल्य विकास महत्त्वाचा आहे. कौशल्यवान पिढी घडवण्यासाठी दहावी, बारावीनंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने हे शिबिर ठेवले आहे. यामध्ये दहावी, बारावीनंतरचे महविद्यालयीन शिक्षण व विविध प्रकारचे अभ्यासक्रम, महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना व करिअर प्रदर्शन यांची माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थी व पालकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. कोतवडेकर यांनी केले.